सर्वार्थ सिद्धी अमृत योगात संकष्ट चतुर्थी: व्रताचे महात्म्य; माघ महिन्यातील महत्त्व, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:57 IST2025-02-14T12:57:34+5:302025-02-14T12:57:41+5:30

Magh Sankashti Chaturthi Vrat 2025: फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? माघ संकष्ट चतुर्थीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या...

magh sankashti chaturthi vrat february 2025 know about date time shubh muhurt and singnificance in marathi | सर्वार्थ सिद्धी अमृत योगात संकष्ट चतुर्थी: व्रताचे महात्म्य; माघ महिन्यातील महत्त्व, मान्यता

सर्वार्थ सिद्धी अमृत योगात संकष्ट चतुर्थी: व्रताचे महात्म्य; माघ महिन्यातील महत्त्व, मान्यता

Magh Sankashti Chaturthi Vrat 2025: माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी, भीष्माष्टमी, भीष्मद्वादशी असे सण येतात. माघ पौर्णिमा, गुरुप्रतिपदा यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी. माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. काही ठिकाणी या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थीचे व्रत अतिशय मनोभावे आचरले जाते. फेब्रुवारी महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताची तारीख, शुभ मुहूर्त आणि काही मान्यता जाणून घेऊया...

विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. 

माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी तारीख, शुभ मुहूर्त आणि शुभ योग

माघ महिन्यात वद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ०५ वाजून १६ मिनिटे ते सकाळी ०६ वाजून ०७ मिनिटांपर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २८ मिनिटे ते ०३ वाजून १२ मिनिटे आहे. गोधुली मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्री ०७ वाजून ३५ मिनिटांपर्यंत आहे. तर अमृत काल रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे ते ११ वाजून ३६ मिनिटे आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग जुळून येत आहेत. 

संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाला महत्त्व

संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात, असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला महत्त्व असते. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य देऊन गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून व्रताची सांगता करता येते.

 

Web Title: magh sankashti chaturthi vrat february 2025 know about date time shubh muhurt and singnificance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.