Jaya Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक पुण्य फलदायी व्रते, सण साजरे केले जातात. अनेकार्थाने माघ महिना अनन्य साधारण मानला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत आचरले जाते. या एकादशी व्रतांची नावे वेगवेगळी असतात. या नावांवरून त्या एकादशीचे महात्म्य आणि महत्त्व अधोरेखित होते. माघ शुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशी आहे. जया एकादशीला येणारे शुभ योग, शुभ पारण मुहूर्त, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...
या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक एकादशीला श्रीविष्णूंची पूजा केली जाते. श्रीविष्णूंशी संबंधित स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप केले जातात. नामस्मरण केले जाते. एकादशीला विष्णू सहस्रनामाचे पठण करणे पुण्यफलदायी मानले जाते.
जया एकादशी व्रत पूजन आणि पारणाचा शुभ मुहूर्त
माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०९ वाजून २७ मिनिटांनी सुरू होत आहे. माघ शुद्ध एकादशी शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०८ वाजून १४ मिनिटांनी संपत आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे माघ शुद्ध जया एकादशीचे व्रत शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी आचरावे, असे सांगितले जात आहे. या दिवशी शुभ मानला गेलेला रवि योग जुळून आला आहे. जया एकादशीचा पारण मुहूर्त रविवार, ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ५१ मिनिटांपासून ०९ वाजून ०६ मिनिटांपर्यंत असेल.
जया एकादशी व्रत तीन प्रकारे केले जाते
एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे, गरजूंना दान करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे.
जया एकादशी व्रतपूजन कसे करावे?
सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
जया एकादशी व्रताचरणाची सांगता कशी करावी?
जया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.