Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:49 IST2025-11-03T12:45:06+5:302025-11-03T12:49:05+5:30

Life Lesson: महिला क्रिकेट पटू शेफाली वर्माचे ताजे उदाहरण आणि लेखात दिलेली बोधकथा लक्षात ठेवली तर तुम्ही अपयशाने कधीही खचून जाणार नाही हे नक्की!

Lifelesson: Everyone's time comes, but you have to be prepared like Shefali Verma and 'this' thing! | Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!

Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यातच लक्षवेधी ठरली, ती शेफाली वर्मा. जी आठवड्यापूर्वी घरातून मॅच बघत होती. पण एक खेळाडू जखमी होते काय, तिच्या जागी शेफाली येते काय आणि मॅच जिंकून देते काय! खरोखरच अनकलनीय! वपु काळे म्हणतात तसं, एकदा येते ती संधी! शेफालीच्या वाट्याला ती आली आणि तिचं तिने सोनं केलं. अर्थात युद्धाची तयारी शांततेच्या काळात केलेली होती याचं चं ते फलीत! शेफालीची ही प्रेरणादायी गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि स्वतःला आयुष्यात येणाऱ्या सुवर्ण संधीसाठी कायम तयार ठेवा. प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाचा बहरण्याचा काळ वेगळा असतो. म्हणून नाउमेद न होता धैर्याने, संयमाने संधीची वाट पाहिली पाहिजे, शेफालीसारखी आणि पुढे दिलेल्या गोष्टीसारखी!

एका व्यक्तीने आपल्या मोकळ्या खाजगी जागेत मोठी बाग फुलवायची, असे ठरवले. त्याने वेगवेगळे बियाणे आणले. जमिनीची उत्तम मशागत केली. पेरणी केली. सिंचन केले. रोज देखरेख केली. हळू हळू त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. काही रोपट्यांची, काही झाडांची दिसामासाने वाढ होऊ लागली. त्याला फार आनंद झाला. 

प्रत्येक झुडुपाची व्यक्तीगत तपासणी करताना त्याच्या लक्षात आले, अजून 'बांबू'चे बियाणे रूजलेले दिसत नाही. ते वगळता, अन्य फळा-फुलांनी, वेलींनी बहरायला सुरुवात केली होती. मात्र, बांबूची जागा अद्याप मोकळी होती. त्या व्यक्तीला वाईट वाटले, परंतु त्याने प्रयत्न सोडले नाही. वर्षभरात बागेने छान आकार घेतला होता. 

दुसरे वर्ष उजाडले. बागेतील फुला-फळांनी तग धरली होती. वेलींनी सारा परिसर छान नटवला होता. विविधरंगी फुलांनी आणि त्यांच्या सुगंधाने बाग डवरली होती. फुलपाखरे, पक्षी, खारूताई बागेत बागडू लागली होती. मात्र, बांबूची अजूनही प्रगती नव्हती. 

तिसरे वर्ष गेले, चौथे वर्ष गेले. त्या सुंदर बागेकडे लोकही आकर्षित होऊ लागली. फुले-मुले आनंदात दिसत होती. ज्येष्ठ-श्रेष्ठ मोकळ्या वातावरणात फेरफटका मारत होते. निसर्गाच्या साक्षीने मित्र-मैत्रिणींच्या गप्पा रंगत होत्या. हे सर्व पाहताना त्या व्यक्तीचे मन भरून आले. मोकळ्या माळरानावर बगिचा फुलवून एवढ्या लोकांना आनंद देता आला, याचे त्याला समाधान वाटले. मात्र, अजूनही त्याचा व्यक्तीगत आनंद बांबूच्या बियाणात अडकला होता. 

पाचवे वर्ष आले. एक दिवस बागेची मशागत करताना, बांबूच्या बियाणातून छोटे छोटे अंकुर फुटलेले दिसले. बागेतील इतर फुल-झाडांच्या तुलनेत ते अतिशय लहान होते. परंतु, आपली मेहनत वाया गेली नाही, याचे त्या व्यक्तीला समाधान वाटले. रोजची मशागत सुरू होती. पाहता पाहता अवघ्या सहा महिन्यात बांबूच्या झाडांनी ६० फूट उंच झेप घेत, आकाशाच्या दिशेने वाटचाल केली आणि त्याच बांबूच्या झाडांसमोर बाकीची फुल-झाडे खुजी वाटू लागली. ते दृष्य पाहून ती व्यक्ती आनंदून गेली. तिची तपश्चर्या फळाला आली. 

कदाचित आपलीही अवस्था आता बांबूच्या बियाणासारखी असेल. जे रुजायला, वाढायला, झेपावायला वेळ घेत आहे. त्यासाठी लागणारा योग्य कालावधी पूर्ण झाला, की आपल्यालाही आकाशात उंच झेप घेता येईल. फक्त तोवर स्वत:ला पूर्णपणे विकसित करायला हवे, संयम बाळगायला हवा, दुसऱ्यांशी तुलना थांबवून स्वत:ला सिद्ध करायला हवे. 

लक्षात घ्या, लंडन हे शहर न्यूयॉर्कपेक्षा पाच तास पुढे आहे. याचा अर्थ लंडन प्रगतिपथावर आहे आणि न्यूयॉर्क मागे आहे असे नाही. तर, हा केवळ वेळेचा फरक आहे. दोघेही आपापल्या जागी प्रगतीपथावरच आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक जण आपापल्या मार्गाने प्रगती करत असतो, प्रयत्न करत असतो. फक्त प्रत्येकाचा बहरण्याचा काळ वेगळा असतो. मात्र, प्रत्येकाची वेळ येते, हे नक्की! जशी कालच्या सामन्यात शेफाली वर्माची आली!

Web Title : जीवन पाठ: शेफाली वर्मा की तरह, अपने समय के लिए तैयार रहें!

Web Summary : शेफाली वर्मा की सफलता और बांस के बीज की दृष्टांत बताते हैं कि हर किसी का समय आता है। धैर्य, तैयारी और आत्म-विकास महत्वपूर्ण हैं। लंदन और न्यूयॉर्क की तरह, हर कोई अपनी गति से प्रगति करता है; आपका समय आएगा।

Web Title : Lifelesson: Like Shefali Verma, Prepare for Your Time to Shine!

Web Summary : Shefali Verma's success and the bamboo seed parable illustrate that everyone has their time. Patience, preparation, and self-development are key. Like London and New York, everyone progresses at their own pace; your time will come.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.