Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:00 IST2025-10-04T07:00:00+5:302025-10-04T07:00:02+5:30

Kojagiri Purnima 2025: सोमवार 6 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे, त्यादिवशी भोंडला खेळून खिरापत वाटली जाते, तिचे वैशिष्ट्य माहितीय? वाचा.

Kojagiri Purnima 2025: The conclusion of the Bhondla takes place on the evening of Kojagiri; What is the food? | Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत?

Kojagiri Purnima 2025: कोजागरीच्या सायंकाळी होतो भोंडल्याचा समारोप; काय असते खिरापत?

यंदा ६ ऑक्टोबर रोजी कोजागरी (Kojagiri Purnima 2025) आहे. ज्यांचा नवरात्रीत भोंडला खेळायचा राहून गेला, त्यांनी कोजागिरीला भोंडला खेळावा. काय आहे या खेळात? त्यात खिरापत का वाटली जाते? या खेळाचा संबंध कोणत्या प्रकारच्या पूजेशी आहे का? असल्यास कोणाची पुजा? या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि त्यानिमित्ताने शिकूया एक मजेशीर खेळ - बालाजीची सासू मेली!

कोण बालाजी, त्याची सासू कोण, ती कधी मेली? हो! हो! हो! सांगते. तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देते. त्याआधी मला एक खुलासा करू द्या. ही काही कोणाच्या निधनाची वार्ता नाही, तर हा आहे, एक गमतीशीर खेळ, भोंडला! मनोरंजन आणि परंपरा यांचा सुंदर मेळ! नवरात्रीची ओळख. पूर्वीच्या ताई-माई, आक्कांना क्षणिक मोकळीक. तिही 'ऐलमा, पैलमा, गणेश देवा'च्या साक्षीने...

‘रांधा, वाढा आणि उष्टी काढा’, या जीवनसूत्रात अडकलेल्या स्त्रियांना या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने थोडीशी विश्रांती, मनोरंजन, पोटभर गप्पा आणि खिरापतीची मेजवानी. हे स्वरूप आहे, नवरात्रीत घरोघरी खेळल्या जाणाऱ्या भोंडल्याचा. असे कार्यक्रम, उत्सव, भेटी-गाठीचे प्रसंग हे पूर्वीचे मनोरंजनाचे माध्यम होते. आता, मनोरंजनाची साधने वाढली, परंतु मनोरंजन करून घ्यायला वेळच अपुरा पडू लागला. तरीदेखील, काही हौशी मैत्रिणी आपली परंपरा, संस्कृती टिकवून आहेत. कमी-अधिक प्रमाणात गावात, शहरात आजही भोंडल्याचा खेळ रंगतो. तर काही ठिकाणी कोजागरी पौर्णिमेला महाभोंडल्याचे अर्थात मोठ्या प्रमाणात भोंडला खेळाचे आयोजन केले जाते. 

त्याच सणांपैकी एक सण, उत्सव, समारंभ म्हणजे आजचा हादगा. भाद्रपद प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत होतो. खांदेशात भोंडला, विदर्भात भुलाबाई भुलोजी, पश्चिम महाराष्ट्रात हादगा भुलोजी, (शंकर पार्वती) यांची पुजा करतात. आश्विन पौर्णिमेपर्यंत ही जगन्मातेची पुजा चालते. रोज एका नव्या घरी किंवा एकाच मोठ्या घरी, ओसरीत वा अंगणात किंवा शहरात मोठ्या सभागृहात भोंडला खेळतात. रोज एकेक भोंडल्याची गाणी वाढवत नेतात. कित्येक वेळेला एकाच दिवशी तीन तीन घरातही एकानंतर एक खेळवला जातो. देवीची विविध वयातली रुपे तेथे विविध कुटुंबातून प्रगट होतात. बालिका, गौरी, षोडशा, तरुणी, प्रौढा, वृद्धा. जशा सप्त मातृकाच जणू. ते तेजच सांगते- ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐंद्राणी, चामुंडा!

पाटावर दोन भुलाबाई भुलोजी मांडून, एक हत्तीचे चित्र काढून पुजा करतात. त्याच्याभोवती फेर धरून गाणी, नाच, हास्याविनोद चालू असतात. एक सूर एक ताल. ‘ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडीला, करीन तुझी सेवा’ सर्वपरिचित गाणे, प्रथम म्हटले जाते. टिप‍ऱ्या, म्हणजे गुजराती गरबाच.  नाही तर आहेतच आपल्या हस्ततालिका. सगळ्यांचे पाय थीरकतातच. खरे तर ही पर्जन्यपुजा. मेघ पुजा. हत्तीसारखे काळेकुट्ट ढग. धरतीला चिंब भिजवतात. जलकृपा करतात. हिरवागार शालू पृथ्वीला नेसवतात. शेती संस्कृतीचे हे समृद्धीचे प्रतीक. धरती आई आणि मेघ बाप. म्हणून हस्त नक्षत्राला महत्व. तेच प्रतीक पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते. पूर्वी सगळ्या वयोगटातल्या महिला वर्गाची गाणी पाठ असत, आता रेकॉर्ड लावून फेर धरतात, पण खेळतात, हे महत्त्वाचे.

भोंडल्यातली गाणी ऐकली, तर लक्षात येईल, यात स्त्री मनाचा संवाद आहे. सुख-दु:ख सांगणार कोणाला? माहेर कोसो दूर, मैत्रिणीशी रोजच्या गप्पा नाही. झाकली मूठ अशा निमित्ताने काव्यातून खुलते आणि शेजारच्या, पाजारच्या काकू, आत्या, आजी, मावशी यांच्याकडून जखमेवर मायेची फुंकर घातली जाते. भोंडल्याची गाणी लोकगीतांचा वारसा सांगणारी आहेत. तत्कालीन समाजाचे चित्र त्यातून प्रगट होते. कालानुरूप त्यातही बदल झाले आहेत. अनेक कवयित्रींनी आपली प्रतिभा पणाला लावून कालानुरूप त्यात बदल केले आहेत. मात्र, या खेळातला उत्साह आजही टिकून आहे.

भोंडला खेळून दमलेल्या सख्यांना श्रमपरिहार म्हणून खाऊ देण्याची पद्धत. परंतु, तो देण्याआधी ओळखायचा. बंद डबा वाजवून, क्ऌप्ती लढवून, वेगवेगळ्या पदार्थांचे नाव घेत खाऊ ओळखण्याचा कार्यक्रम चाले. त्यातूनच जन्माला आली आणि 'श्री बालाजिचि सासु मेली.' या वाक्यातली सगळी अद्याक्षरे खाऊची नावे आहेत.
श्री-श्रीखंड, 
बा-बालुशाही, 
जि-जिलेबी, 
चि-चिवडा, 
सा-साठोऱ्या, 
सु- सुधारस, 
मे- मेवा, 
ली- 
तोही मीच सांगायचा? तेवढा एक प्रकार तरी तुम्ही ओळखाच! बघुया बरं, कोणाला खाऊ ओळखता येतोय ते...!

आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी,
आत पडला शिंपला, आमचा भोंडला संपला!

Web Title : कोजागिरी पूर्णिमा 2025: भोंडला का समापन; क्या है 'खिरापत'?

Web Summary : कोजागिरी पूर्णिमा भोंडला का समापन है, जिसमें गाने, नृत्य और 'खिरापत' शामिल हैं—यह भोजन वस्तुओं का अनुमान लगाने वाला एक खेल है। यह महिलाओं का जमावड़ा उर्वरता, फसल और समुदाय का जश्न मनाता है।

Web Title : Kojagiri Purnima 2025: Bhondla concludes; what is 'khirapat'?

Web Summary : Kojagiri Purnima marks Bhondla's end, a Navratri tradition featuring songs, dance, and 'khirapat'—a game involving guessing food items. This women's gathering celebrates fertility, harvests, and community.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.