‘कोजागरी’ला मसाला दुधावर ताव आणि खेळांची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:58 IST2025-10-06T10:57:52+5:302025-10-06T10:58:05+5:30
Kojagiri Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेचे हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्व, त्यामागील संकल्पना, पौराणिक आख्यायिका त्याचबरोबर खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिकतेचा वेध...

‘कोजागरी’ला मसाला दुधावर ताव आणि खेळांची धमाल
- सोनल मंडलिक-शिंदे
उपसंपादक
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पाैर्णिमेला विशेष महत्त्व आहे. नारळी पाैर्णिमा, होळी पाैर्णिमा, वटपाैर्णिमा त्याचप्रमाणे शरद ऋतूमध्ये येणाऱ्या ‘शरद पाैर्णिमे’लाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी दसरा झाल्यानंतर अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ‘शरद पौर्णिमा’ साजरी केली जाते. याला ‘कोजागरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. पाैराणानुसार, कोजागरी पाैर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गवळणींसोबत महारासलीला केली होती, त्यामुळे या पाैर्णिमेला ‘रास पाैर्णिमा’ असेही म्हणतात. आपल्याकडे कोजागरी पाैर्णिमा म्हणजे आटवलेले मसाला दूध, रात्रीच्या चांदण्यांत रंगलेले विविध खेळ, गरबा आणि धिंगाणा असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, इतर पाैर्णिमांप्रमाणेच कोजागरी पाैर्णिमा साजरी करण्यामागेही धार्मिक कारणांसह वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय कारणे दडलेली आहेत.
यंदा कोजागरी पाैर्णिमा तिथी ६ ऑक्टोबरला दुपारी १२:२३ वाजता सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबरला सकाळी ९:१६ पर्यंत असणार आहे. कोजागरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबरला रात्री ११:४५ ते ७ ऑक्टोबरला रात्री १२:३४ पर्यंत आहे. त्यामुळेच यावेळी कोजागरी पौर्णिमा ६ ऑक्टोबरला साजरी होणार असून, चंद्रोदय सायंकाळी ५:२७ वाजता होणार आहे. त्यामुळे कोजागरी पूजेसाठी ४९ मिनिटे मिळणार आहेत.
खगोलशास्त्रीय कारणे
वर्षभरात फक्त कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्र १६ कलांनी भरलेला असतो. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो, यालाच ‘चंद्राच्या कला’ म्हणतात. कोजागरीच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो. त्यामुळे सर्व ग्रहांतून आलेली सकारात्मक ऊर्जा चंद्र प्रकाशाच्या माध्यमातून पृथ्वीवर पडते. याला अमृताएवढे महत्त्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी मसाला दूध आटवून चंद्र प्रकाशात ठेवले जाते. त्यानंतर लक्ष्मीला नैवद्य दाखवून सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जाते.
पाैराणिक आख्यायिका
कोजागरी पाैर्णिमेच्या दिवशी समुद्र मंथन झाले होते आणि त्यातूनच लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे हा दिवस लक्ष्मीचा जन्मोत्सवही. या दिवशी लक्ष्मीसह भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. पाैराणिक कथांनुसार, या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रलोकातून भूलोकात येते आणि ‘को जागर्ति?’ म्हणजे ‘कोण जागे आहे?’ असा प्रश्न विचारते. त्यामुळे या रात्री विविध खेळ खेळून, जागरण करून देवीचे स्मरण केले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोन
वैज्ञानिकदृष्ट्या रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा दूध ठेवल्याने त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात. दुधात लॅक्टिक ॲसिड असते, जे चंद्राच्या स्वच्छ प्रकाशामुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. तसेच तांदळात असलेल्या स्टार्चमुळेही प्रक्रिया आणखी जलद होते. त्यामुळे ही खीर खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते.