जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:16 IST2026-01-02T14:13:18+5:302026-01-02T14:16:44+5:30
Ayodhya Ram Mandir New Year 2026: गतवर्षीपेक्षा यंदा अयोध्येत जास्त भाविकांची गर्दी असेल, असा वर्तवण्यात आलेला अंदाज खरा ठरला आहे.

जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
Ayodhya Ram Mandir New Year 2026: अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. याच वेळेस इंग्रजी नववर्ष २०२६ चा पहिला दिवस होता. नववर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी तब्बल ४ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी दर्शन घेतले आहे.
रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत भाविकांचा महासागर लोटला आहे. दोन वर्षांत भाविकांनी दर्शन घेण्याचे सर्व रेकॉर्ड्स मोडले गेले आहे. अल्पावधीत एवढ्या प्रचंड प्रमाणात भाविकांनी राम मंदिरात जाऊन दर्शन घेणे विशेष मानले गेले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राम मंदिरात मोठी गर्दी झाली होती. सुमारे ४ लाख भाविकांनी अयोध्या राम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी हजारो लोकांनी शरयू स्नान केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईचा समावेश असल्याचे दिसून आले.
जाणकारांचा अंदाज अगदी खरा ठरला
राजघाट आणि राम की पैडी येथेही मोठी गर्दी होती. राम पथालगतच्या परिसरात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक चौकांवर मार्ग वळवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा राम मंदिरात जास्त गर्दी होईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तवला होता. तो खरा ठरला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून अयोध्येत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली. राम मंदिर, हनुमानगढी, कनक भवन आणि इतर मंदिरांमध्ये भाविकांची लांब रांग होती. शरयू नदीच्या काठावर भाविकांची गर्दी दिसून आली. राम मंदिरे खुले होण्यापूर्वीच भाविक रांगेत उभे होते. रामललाचे दर्शन सुरू होताच हजारो लोकांनी जय श्री रामच्या घोषणा देत दर्शन घेतले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचा आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वांनी राम चरणी प्रार्थना केली. सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली. नागेश्वर नाथ हनुमानगढी, कनक भवन या मंदिरांमध्ये भाविकांची संख्या सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त होती. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. हा दिवस आपल्या श्रद्धा आणि परंपरेचा दिव्य उत्सव असल्याचे म्हटले आहे. 'या पवित्र प्रसंगी, देश-विदेशांतील सर्व रामभक्तांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या चरणी माझे कोटी कोटी नमन! सर्व देशवासीयांना माझ्या अनंत शुभेच्छा,' असे मोदी म्हणाले.