प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:44 IST2025-10-09T15:43:03+5:302025-10-09T15:44:06+5:30
Premanand Maharaj Health Update: कालच्या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांचा सुजलेला चेहरा आणि विस्कटलेले केस पाहून भाविकांनी काळजी व्यक्त केली, त्यावर आश्रमाने दिली माहिती.

प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती
Premanand Maharaj Health Update: वृंदावनचे प्रेमानंद महाराज आपल्या अमोघ वाणी, उच्च विचार, अध्यात्म सोपे करून सांगण्याची कला आणि प्रसन्न चेहऱ्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे प्रवचन, छोट्या छोट्या रीलमधून केलेला मोठा बोध, राधे राधे नामजप अशा अनेक गोष्टी भाविक फॉलो करतात.
प्रेमानंद महाराज हे आज जगभरातील लाखो भक्तांसाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे केंद्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराजांच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या कोट्यवधी अनुयायांमध्ये मोठी चिंतेची लाट पसरली होती. 'महाराजांची प्रकृती आणखी खालावली आहे,' अशा आशयाच्या बातम्या व्हायरल होत होत्या.
पण प्रेमानंद महाराजांना नेमकं झालं काय?
>> महाराजांची दोन्ही मूत्रपिंडे (Kidneys) निकामी झाली आहेत. या गंभीर आजारामुळे शरीरातील रक्त शुद्ध करण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे.
>> यामुळे त्यांना अनेक वर्षांपासून सातत्याने डायलिसीस (Dialysis) उपचार घ्यावे लागतात. डायलिसिसची प्रक्रिया वेळखाऊ आणि शारीरिकदृष्ट्या कष्टप्रद असते.
>> महाराजांना दिवसातून अनेक वेळा डायलिसिस करून घ्यावे लागते, ज्यामुळे त्यांच्या नित्य नियमांमध्ये आणि प्रवचनांमध्ये थोडा बदल करावा लागला आहे.
तरीसुद्धा ते रोजच्या प्रवचनातून भाविकांना छान छान संदेश देत असतात. मात्र ८ ऑक्टोबर रोजी शेअर केलेल्या रील मध्ये महाराजांचे विस्कटलेले केस, सुजलेले डोळे, सुजलेला चेहरा आणि आवाजात थकवा यामुळे भाविक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी महाराजांना लवकर बरे व्हा म्हणत सदिच्छा व्यक्त केल्या. मात्र त्यानंतर अफवांना आलेले उधाण पाहता 'भजन मार्ग. कॉम' या आश्रमाच्या अधिकृत पेज वरून माहिती शेअर करण्यात आली आहे. ज्यामुळे भक्तांना दिलासा मिळाला आहे.
आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती :
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाने सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले असून, महाराजांच्या आरोग्याबद्दलची नेमकी आणि सत्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. आश्रमाने स्पष्ट केले आहे की, महाराजांची प्रकृती ठीक आहे आणि स्थिर आहे. प्रकृती खालावल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही सत्य नाही. तशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. सध्या त्यांची पदयात्रा थांबवली असून काही काळातच प्रवचने सुरु करतील.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी वेळोवेळी महाराजांचे दर्शन घेतलेले आहे. अशा संतपुरुषांबद्दल छोटीशी बातमीही लगेच व्हायरल होते, ज्यामुळे अफवांना वेग मिळतो. आश्रमाने विशेषतः सर्व भक्तांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अपुष्ट आणि असत्यावर आधारित अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराजांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती केवळ आश्रमाच्या अधिकृत माध्यमांतून (Official Channels) दिली जाईल, त्यामुळे केवळ त्यावरच विश्वास ठेवावा.