तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:04 IST2025-04-11T18:57:06+5:302025-04-11T19:04:04+5:30
Hanuman Jayanti Janmotsav April 2025: साडेसाती, शनिचा ढिय्या प्रभाव तसेच शनिची महादशा सुरू असलेल्यांनी आवर्जून मारुतीरायाची उपासना, नामस्मरण करावे, असे सांगितले जाते. नेमके कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...

तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
Hanuman Jayanti Janmotsav April 2025: मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।। बुद्धी, शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा अद्भूत संगम आणि अनेकविध गोष्टींचा परम आदर्श असणाऱ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा, १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. आताच्या घडीला ज्या राशींची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू आहे, अशांनी हनुमानाची नियमित उपासना करणे अत्यंत शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानले जाते. हनुमान उपासनेमुळे शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो, असेही म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घ्या...
जिथे जिथे प्रभू रामचंद्रांचे गुणगान चालले असेल तिथे तिथे मारुतीराय उपस्थित असतात असा पूर्वसुरींचा निर्वाळा आहे. रामगुणसंकीर्तनाला सर्वांच्या आधी मारुती येतो आणि सर्वांत शेवटी जातो, असे सांगितले जाते. मारुती हा मुळात सुग्रीवाचा सेनापती, सुग्रीवाचा मित्र. पुढे सीतेचा शोध करायला त्याने रामाला बहुमोल मदत केली. त्याच्या नावाचा उच्चार करताना रामभक्त, रामदूत अशी विशेषणे लावली जातात. त्याने रामाच्या जीवनाशी आपल्या जीवनाचा प्रवाह जणू एकरूप करून टाकला होता. कोणत्याही मोठ्या अडचणीच्या प्रसंगातून रामाला कसे बाहेर काढावयाचे, हा एकच विचार मारुतीच्या मनात घोळत असे आणि त्यामुळेच की काय मारुतीबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भक्तिभाव सर्वत्र आढळून येतो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. २९ मार्च २०२५ रोजी शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसाती चक्र बदलले आहे. आता ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्यांनी हनुमानाची नित्य उपासना करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. तसेच काही उपाय रामबाणाप्रमाणे अत्यंत अचूक आणि प्रभावी मानले गेले आहेत.
संकल्प करा आणि हनुमान, शनि उपासना सुरू करा
रामायण काळात रावणाच्या तावडीतून शनिला हनुमंतांनी सोडवले होते, अशी एक कथा प्रचलित आहे. या कारणामुळे हनुमंतांचे नियमित पूजन, उपासना, नामस्मरण केल्यास शनि त्रास देत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. हनुमानाला महादेवांचाच अंश मानले जाते, महारुद्र मानले जाते. म्हणूनच जी शक्य आहे, ती शनि उपासना, हनुमानाची उपासना नियमितपणे संकल्प करून सुरू करावी, असे सांगितले जाते. हनुमान असो किंवा शनि देव असो, मनापासून संकल्पपूर्तीचा प्रयत्न करावा. जी काही उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप केले जातील, ते अगदी मनोभावे, प्रामाणिकपणे, श्रद्धेने, निष्ठेने आणि समर्पणपूर्वक करावेत, असे सांगितले जाते.
कोणत्या राशींची शनि साडेसाती आणि शनिचा ढिय्या प्रभाव सुरू?
२९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीचे चक्र बदलले. मकर राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. तसेच मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे. तर, मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तसेच शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त झाला आहे. तर, सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे.
मारुतीरायाचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रे म्हणा
यंदाच्या हनुमान जन्मोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस शनिवारी आला आहे. महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी शनिचीही उपासना मोठ्या प्रमाणावर केली जाते. आवर्जून हनुमान आणि शनि मंदिरात हजारो भाविक जातात. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्यांनी हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत, असे सांगितले जाते. तसेच शनिवारी हनुमानाशी निगडीत मंत्रांचे जप करावेत. हनुमानाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात, हनुमानाशी संबंधित गोष्टींचे दान करावे, असे म्हटले आहे.
शनिवारी आवर्जून करा शनि संबंधिचे उपाय
- शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.
- नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा. यापैकी एका मंत्राचा दररोज १०८ वेळा जप केल्यास उत्तमच. विशेषत: शनिवारी अवश्य करावा.
- कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शनानंतर शनीचे रत्न नीलम शास्त्रशुद्ध पद्धतीने धारण करावे.
- शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
- पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.