Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:50 IST2025-08-16T14:48:44+5:302025-08-16T14:50:19+5:30
Gopal Kala 2025: कृष्ण जन्मानंतर १४ वर्षांनी देवकी वसुदेवाला मिळाली मुक्ती, पुत्र प्राप्ती होऊनही त्यांच्या वाट्याला हे भोग का आले? याचं कृष्णाने दिलेलं उत्तर जाणून घ्या.

Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री देवकी वसुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यावेळी ते दोघेही बंदिवासात होते. कारण देवकीच्या आठव्या पुत्रापासून तिच्या भावाला म्हणजेच कंसाला मृत्यूचे भय होते. ही आकाशवाणी झाल्यापासून कंसाने दोघांना नजरकैदेत ठेवले होते. देवकीची सहा बाळं मारली. सातवा गर्भ गळाला असे कंसाला वाटले, मात्र नियतीने तो गर्भ सुरक्षितपणे वासुदेवाच्या दुसऱ्या पत्नीच्या उदरी पाठवला. कालांतराने भाद्रपद षष्ठीला तिला मुलगा झाला त्याचे नाव बलराम ठेवण्यात आले. वासुदेवाचा मित्र नंद याने त्या बाळाचे थाटात बारसे केले. आठव्या वेळेस देवकी गर्भवती राहिली तेव्हा नंदाची पत्नी यशोदाही गर्भवती राहिली आणि दोघींना श्रावण वद्य अष्टमीला संततीप्राप्ती झाली. देवकीला मुलगा आणि यशोदेला मुलगी. मात्र कंसाने या बाळाला मारण्याआधी त्याला नंदाच्या वाड्यात पोहोचवण्याची वासुदेवाला भगवंताने जबाबदारी सोपवली. सैनिकांसकट सर्व प्रजाजन योगनिद्रेमध्ये झोपले असताना वासुदेव तान्ह्या बाळाला घेऊन गोकुळात निघाला. यमुना नदी पार करून नंदाच्या वाड्यात पोहोचला. आपला मुलगा तिथे ठेवून तिथे नुकतीच जन्माला आलेली योगमाया घेऊन वासुदेव परत आला. येताच तिने मोठ्याने टाहो फोडला. कंसाला जाग आली आणि तो तिला मारायला पोहोचला. ती कन्या हातातून निसटली आणि जगदंबा प्रगट झाली आणि तिने कंसाला सांगितलं तुझा काळ जन्माला आला आहे.
आपलं बाळ नंदाच्या घरी सुखरूप आहे हे ऐकून देवकी वासुदेवाला समधान मिळाले. मात्र कंसाने त्यांना बंधमुक्त केले नाही उलट त्यांच्यावर कठोर नियम लादले. असे एक दोन नाही तर १४ वर्ष चालले. तोवर नंदाच्या घरी यशोदेला सुख देऊन कृष्ण मोठा झाला आणि त्याने मथुरेकडे कूच केली. कंसाचा वध केला आणि त्याच्या बंदिवासात असलेल्या सगळ्या निरपराधी कैद्यांची सुटका केली. त्यातच त्याचे जन्मदाते आई वडील होते. त्यांनी बाहेर आल्यावर कृष्णाला डोळे भरून पाहिले. तेव्हा देवकी म्हणाली कृष्णा यायला एवढी वर्ष का लावलीस?
कृष्ण म्हणाला, एवढी कुठे? मोठा होताच आलो.
देवकी म्हणाली तरी १४ वर्ष लावलीस कृष्णा.... जन्म माझ्या पोटी घेतलास पण मातृसौख्य यशोदेला दिलंस. नक्की कसली शिक्षा दिली मला?
कृष्ण हसून म्हणाला, 'आई...शिक्षा देणारा मी कोण? मी फक्त परतफेड केली.
देवकी डोळ्यात प्राण आणून म्हणाली, 'कसली रे परतफेड?'
कृष्ण म्हणाला.... 'राम अवतारकार्यात दिलेल्या १४ वर्ष वनवासाच्या शिक्षेची!'
या उदाहरणावरून लक्षात येते, की कृष्णाने भगवद्गीतेत कर्मयोग केवळ सांगितला नाही तर तो आचरणातही आणला. तुम्ही जे कर्म कराल त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे, या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. आपले भोग हे आपल्यालाच संपवावे लागतात. त्यामुळे कर्म शुद्ध ठेवा, फळ शुद्धच मिळेल.