नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:29 IST2025-10-01T14:29:16+5:302025-10-01T14:29:59+5:30
Navratri 2025: नवरात्रीत स्थापन केलेल्या घटाचे विसर्जन नवमीला करावे की दशमीला? गोंधळू नका, वाचा ही शास्त्रोक्त माहिती!

नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
नवरात्रीचे(Navratri 2025) ९ दिवस आनंदात, उत्साहात, चैतन्यमयी साजरे झाले. कुठे गरबा तर कुठे भोंडल्याचा खेळ रंगला. देवीची गाणी, जोगवा, परडी भरून भक्तांनी आईपाशी कृतज्ञता व्यक्त केली. तिचे दर्शन घेऊन ओटी भरली आणि त्याबरोबरच घटस्थापनेला घट बसवून नऊ दिवस झेंडूच्या माळा अर्पण करून अखंड नंदादीप तेवत ठेवला. एवढी सगळी पूजा बांधल्यावर त्याचे विसर्जनही शास्त्रशुद्ध पद्धतीनेच व्हायला हवे ना? याबाबत शेखर क्षीरसागर गुरुजी यांनी दिलेली विधिवत माहिती आणि विसर्जनाची तिथी जाणून घेऊ.
नवरात्रीचा घट विसर्जनाचा मुहूर्त :
यंदा नवरात्रीत तिथी विभागून न आल्यामुळे पूर्ण दहा दिवसाचा उत्सव साजरा करता आला. मात्र त्यामुळे गोंधळ कमी व्हायचा सोडून वाढला आहे, असे लक्षात आले. घटाचे विसर्जन कधी असा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार विचारला जाऊ लागला. त्यावर उत्तर हेच, की घटाचे उत्थापन अर्थात विसर्जन दसऱ्यालाच करायचे आहे. मात्र काही लोकांकडे कुलाचार म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीला घट विसर्जित करण्याची प्रथा आहे. तसे असेल तर घरचा कुलधर्म करा आणि तसा नियम नसेल तर शास्त्रानुसार दसऱ्याला सकाळी घट विसर्जित करा.
रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते, असे त्यामागचे कारण आहे.
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
घट विसर्जनाचा विधी :
>> नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी.
>> नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा.
>> धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी.
>> जेवणाचा नैवेद्य दाखवून, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी.
>> पुरणाचे दिवे नऊ, पाच, सात असे करावेत सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा.
>> सर्व दिव्यात तूप आणि वात घालावी, मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीच्या पाच वातीचा एक जुडगा लावावा. पुरणाची आरती करावी.
>> कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे.
>> दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे.
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
देवीची आरती :
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥