गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:44 IST2025-08-26T16:39:47+5:302025-08-26T16:44:54+5:30

Gajanan Maharaj Punyatithi Smaran Din 2025: विविध समस्या, अडचणींवर रामबाण उपाय मानला गेलेल्या ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे एक दिवसात पारायण कसे करावे? जाणून घ्या...

gajanan maharaj punyatithi smaran din 2025 know how to recite the shri gajanan vijay granth parayan in one day | गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

Gajanan Maharaj Punyatithi Smaran Din 2025: विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे श्री गजानन महाराज यांचा स्मरण दिन भाद्रपद शुद्ध पंचमीला असतो. यंदा गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गजानन महाराज पुण्यतिथी आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. लाखो भाविक महाराजांचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना मंत्रांचा जप करतात. विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतात. गजानन महाराजांचा ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ हा अतिशय पुण्य फलदायी मानला जातो. गजानन महाराज स्मरण दिनानिमित्त एका दिवसात याचे पारायण केले जाऊ शकते, जाणून घेऊया...

श्री गजानन महाराजांनी सुमारे ३२ वर्षे भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. गजानन महाराजांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे. अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. संत श्री दासगणू महाराज विरचित "श्री गजानन विजय ग्रंथ" हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.

अनेक भाविक करतात नियमित ‘श्री गजानन विजय’ पारायण

अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात. गजानन महाराजांचा प्रकट दिन किंवा स्मरण दिन या दिवशी आवर्जून ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथाचे पारायण केले जाते. या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यांमधली एक ओवी "कोठोनी आलो आपण । याचे करा हो चिंतन " आपल्याला जीवनाचे तत्त्वज्ञान विशद करते. 

विविध समस्या, अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय

श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य “श्री गजाननविजय ग्रंथ” वाचनात आहे. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन अन् एकदा तरी पारायण करा श्री गजाननविजय ग्रंथाचे, असे म्हटले जाते. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. जीवनातील विविध समस्या, अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते. 

एका दिवसांत ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण कसे करावे?

श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते. तीन दिवसीय पारायण, सप्ताह पारायण, चक्री पारायण किंवा २१ दिवसीय पारायण, सामूहिक पारायण, संकीर्तन पारायण गुरुवारचे पारायण. परंतु, एका दिवसातही ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करता येते.

- एकआसनी पारायण: एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे.

- एकदिवसीय पारायण: एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करता येऊ शकते. आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक किंवा दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते एक दिवसीय पारायण. 

॥ श्री गजानन जय गजानन ॥

॥ गण गण गणात बोते ॥

॥ श्री स्वामी समर्थ ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

 

Web Title: gajanan maharaj punyatithi smaran din 2025 know how to recite the shri gajanan vijay granth parayan in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.