पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:34 IST2025-07-27T14:33:37+5:302025-07-27T14:34:53+5:30
First Shravan Somwar 2025: २०२५ मधील पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? शिवपूजनाची सोपी पद्धत, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
First Shravan Somwar 2025 Vrat Vidhi: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे. आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालकर्ते श्रीविष्णू योगनिद्रेत जातात, त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकरांकडे असते. श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकरांचे विशेष पूजन करून शिवामूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे. यंदा २०२५ च्या पहिल्या श्रावण सोमवारी शंकराचे पूजन कसे कराल, कोणती शिवामूठ अर्पण कराल? जाणून घेऊया...
यंदा पहिला श्रावण सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा या प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू आहेत. काळानुरूप त्यात अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी त्या साजरे करण्याचे उत्साह कमी झालेला नाही. श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.
पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा शिवपूजन व्रत विधी
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते.
पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?
पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये महिला आनंदाने करतात. नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. देण्याचा आनंद काय असतो, ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो.
यंदा श्रावणी सोमवार किती आणि कधी?
- पहिला श्रावणी सोमवार: २८ जुलै २०२५ - शिवामूठ: तांदूळ
- दुसरा श्रावणी सोमवार: ०४ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: तीळ
- तिसरा श्रावणी सोमवार: ११ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: मूग
- चौथा श्रावणी सोमवार: १८ ऑगस्ट २०२५ - शिवामूठ: जव