अतिरिक्त ओझे टाकून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 03:17 PM2020-06-25T15:17:19+5:302020-06-25T15:21:14+5:30

ईशा सेक्रेड वॉक्सच्या कैलास यात्रेतील सहभागींसोबत झालेल्या भेटीत सद्गुरू, आपल्या जीवनात आपण बनवलेल्या खोट्या गोष्टींचा डोंगर कसा कमी करायचा यावर चर्चा करतात. आपल्या डोक्यावर इतके ओझे असेल, तर सहज चालणे अशक्य होते, म्हणूनच ते आग्रह करतात, की अतिरिक्त ओझे टाकून द्या!

Discard the extra burden | अतिरिक्त ओझे टाकून द्या

अतिरिक्त ओझे टाकून द्या

googlenewsNext

प्र: सद्गुरू, आपण म्हणालात की आपण प्रवासी म्हणून कैलासावर गेलो तर डोंगराचा रस्ताच थोडाफार झिजेल , पण आपण यात्रेकरू म्हणून गेलो तर फरक असा पडेल की आपण आपल्या स्वतःच्या आतमधे अधिक काहीतरी झिजवतो. तर आम्ही स्वत:ला थोडे अधिक कसे झिजवू शकतो जेणेकरून आम्ही कैलासासाठी तयार होऊ?

 

सद्गुरू: आपण ज्याला "मी" असे संबोधता ते काय आहे? तुम्ही एक खरी गोष्ट नाही आहात. तुम्ही अनुभवांचे, आठवणींचे, नातेसंबंधांचे, पात्रतेचे आणि अर्थातच आपल्या फेसबुक अकाऊंटचे अशा अनेक गोष्टींचे संच आहात! तुम्ही एक लहानसा तुकडा आहात. तुम्ही जर सर्व काही बाजूला ठेवले आणि जीवनाचा तुकडा म्हणून चालणे शिकलात, तुमच्यात असे काहीतरी आहे जे तुम्हाला तुमच्या पालकांकडून, तुमच्या मित्रांकडून, तुमच्या कुटुंबातून, महाविद्यालयातून किंवा तुमच्या गुणांमुळे मिळाले नाही. केवळ एक गोष्ट सजवण्यासाठी आपण आपल्या जीवनात शरीर आणि सर्वकाही गोळा केले. पण आता या सजावटी इतक्या मोठ्या झाल्या आहेत की आपण काय सजवतोय याचाच विसर पडला आहे.

जीवन सजवणे

एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात काय करत आहे याने काही फरक पडत नाही - कोणी संध्याकाळी मद्यधुंद होत आहे, कोणीतरी अंमली पदार्थांच्या नशेत आहे, कोणी मंदिरात बसून भजन गात आहे, कोणी ध्यान करीत आहे, कोणाला तरी कैलासाला जायचे आहे, तर कोणी पैसे कमविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे - प्रत्येक माणूस केवळ आपले आयुष्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते असे मानतात की असे केल्यामुळे ते घडेल.

आपल्यासाठी आयुष्याच्या वृद्धीचा मार्ग म्हणजे त्याला सजवणे हा आहे. जर आपण एक जोडी कपडे घातले तर ते ठीक आहे. आपण डोंगरावर असताना कदाचित हवामानामुळे, आपण एकावर एक चार जोड घातले असतील. पण फक्त तुमच्याकडे आहेत म्हणून तुम्ही पंचवीस कपडे एकावर एक घालाल का? आणि तुम्ही बारा जोड्या पादत्राणे कशा घालू शकाल?

ही सजावट, आपण ज्याची सजावट करत आहोत त्यापेक्षा अधिक मोठी ठरते कारण कुठेतरी, आपण असा विश्वास ठेवतो की गोष्टी जमा करून आपण अधिक सुखी बनू. गोष्टी जमा करून तुम्ही सोयी आणू शकता परंतु तुम्ही जीवनात सुधारणा आणू शकत नाही. जेव्हा मी “गोष्टी” म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ, त्यात सर्वकाही येतं, त्यात लोक, नातेसंबंध आणि तुम्हाला जे तुमचे आहे असे तुम्हाला वाटते ते सर्वकाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात या सर्व गोष्टी, हा विचार करून जमा केल्यात, की तुम्हाला वाटलं की याने तुमच्यात वृद्धी होईल. हे आपल्याला एक चुकीची समजूत देते की सर्वकाही परिपूर्ण आहे, परंतु जर त्याचा एक भाग कोसळला तर अचानक सारे काही संपलेले आहे असे तुम्हाला वाटू लागेल.

जर जगात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ती व्यक्ती जर तुमची प्रिय व्यक्ती असेल, तर अचानक सर्व काही तुटून पडते. तर घडले हे आहे की जगातील 7.4 अब्ज लोकांमधून एकजण कमी झाला आहे. हे ऐकणे निर्दयी आणि भावनारहित वाटते, परंतु हा मुद्दा नाही. मी भावनेपासून मुक्त नाही. माझे लोकांसोबत अतिशय चांगले संबंध आहेत, परंतु असे का होते की केवळ ही एक व्यक्ती मरण पावली तर सर्व काही तुटून जाते आणि दुसर्‍या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काही फरक पडत नाही.

अगदी लहानपणापासूनच पूर्वग्रहाचे विष आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भिनवले गेले आहे. तुम्हाला सांगण्यात आले, “आपण तीन लोकं एक आहोत. ते इतर लोक आपल्याबरोबर नाहीत. ”याला कुटुंब म्हणतात, हा पहिला गुन्हा, आणि मग त्यातून समाज, धर्म, वंश, राष्ट्रीयत्व असे अनेक थर निर्माण होतात. आता आपल्याला आश्चर्य वाटते की लोक का भांडत आहेत आणि इतका हिंसाचार का आहे. खरं म्हणजे, हे आपणच निर्माण केलेले आहे.

विटा असोत किंवा सोने यामुळे काहीही फरक पडत नाही

इमारत सुंदर असो वा कुरुप, त्याने काही फरक पडत नाही. समस्या अशी आहे की तुम्ही एक टन विटा घेऊन जात आहात. जेव्हा त्या तुमच्या डोक्यावर असतात, तेंव्हा वजन हे वजन असते. समजा मी तुम्हाला एक टन सोनं दिलं – तर तुम्ही ते तुमच्या डोक्यावर ठेवाल का?

तुम्ही एक टन दगडी वाहून नेता आहात की सोनं वाहून नेता आहात, यामुळे काही फरक पडत नाही; तुम्ही जेंव्हा त्याच्याखाली असता तेव्हा तुम्हाला सारखेच वाटते. कारण तुम्ही त्याच्याखाली चिरडूनच मरणार . तुम्ही जे काही वाहून नेता ते भलेही तुम्हाला सुंदर किंवा कुरूप वाटत असले, पण जर ते तुमच्या डोक्यावर असेल तर ते सर्व जे काही मानवी आहे ते या वजनाखाली दबेल.

विष गाळून घेणे

स्वतःला झिजवणे म्हणजे फक्त हेच की जो खोटेपणा तुम्ही रचलाय त्याला झिजवणे.. तुम्ही तयार केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही बाहेरून गोळा केलेल्या गोष्टींचा ढिगारा आहे, जे तुम्ही कधीही नव्हता आणि कधीही नसाल. आत्ता, तुमचा विश्वास आहे की तुम्ही तेच आहात. जर त्याचा एखादा तुकडा काढून घेतला गेला तर तुम्हाला तुमच्यातच काही तरी तुटल्यासारखे वाटते. याच कारणांमुळे, लोकांना अनुभूती होते दुःख, नैराश्य आणि बऱ्याच गोष्टींच्या प्रगल्भ जाणिवांची - ज्यामुळे मानवाचा पूर्णपणे नाश होऊ शकतो. पण ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हीच तुमच्या मनात निर्माण केली आहे, आणि तरीही तुम्ही यावर इतका विश्वास ठेवता की ती तुम्हाला पूर्णपणे नष्ट करू शकते.

जेव्हा आपण शिव विषकंठ आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे सर्व विषांचा निचरा करायचा फिल्टर आहे. आपण जे अन्न खातो किंवा जे पितो त्याद्वारेच विष आपल्यामध्ये नेहमी प्रवेश करत नाही. फक्त एक विचार, एक कल्पना, एक ओळख, भावना तुमच्या संपूर्ण आयुष्यात विष आणू शकते.

कोणत्या गोष्टींनी तुमच्यावर विष प्रयोग केला आहे? तुम्ही एखाद्या गोष्टीला विष म्हणण्याचे फक्त हेच कारण आहे की ते जीवनाचा नाश करते. तुमच्या कल्पना, तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमची ओळख - या गोष्टींनी तुमच्या आयुष्याचा किती प्रकारे नाश केला आहे? तुम्ही एक प्रकारे मानसिकदृष्ट्या वंचित आहात असे तुम्हाला वाटते आणि तुम्हाला असे वाटते की या सर्व गोष्टीशी जोडली गेल्याने तुम्ही बळकट व्हाल. असं काही होणार नाही. एका क्षणी, या गोष्टी तुम्हाला तुम्ही परिपूर्ण झाल्याचे भासवतील, परंतु कधीतरी नक्कीच त्या तुमच्या अपेक्षा भंग करतील नाहीतर मृत्यूच ते तुमच्यासाठी करेल. या ना त्या मार्गाने, तसे घडेलच. याचा असा अर्थ होतो का की मानवी भावना आणि विचारांना काहीच किंमत नाही? तुम्ही याकडे शक्य तितक्या सखोलपणे पहावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासाठी काय मौल्यवान आहे, तुमची भावना, तुमचे विचार की तुमचे जीवन? जीवन, नाही का?

परंतु एका साध्या विचार किंवा भावनेसाठी तुम्ही मरायला तयार असता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्याकडे वरच्याबाजूने खाली पाहात आहात. आयुष्य म्हणजे फक्त जिवंत राहणे असे नाही. एखादी पूर्णपणे बेईमान व्यक्ती जिवंत राहण्यासाठी सर्वकाही सोडून देईल. मी त्याबद्दल बोलत नाही. कारण इथे एक ज्वलंत जीवन आहे म्हणून विचार, भावना, शरीर, कपडे, नातं आणि इतर सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही चुकून परिणामालाच कारण समजलात, तर नंतर बियाणे लावण्याऐवजी तुम्ही झाडच उलट्या बाजूने लावाल.

काशी यात्रा

भारतात एक परंपरा आहे ज्याबद्दल तुम्ही ऐकले असेल. आज तुम्ही काशीला गेलात तर ट्रेनने जाता किंवा विमानाने तिथे थेट उतरता, पण एकेकाळी लोक चालतच काशीला जायचे. आजही भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये प्रतीकात्मक काशी यात्रा आहे. ज्याचे नुकतेच लग्न होणार आहे असा नवरदेव, काशीला जायचे आहे अशी बतावणी करतो. म्हणजेच याचा अर्थ, या सर्व नात्यांचा काहीही अर्थ नाही याची जाणीव त्याला झाली आहे, म्हणूनच तो त्याचे अंतिम स्वरूप शोधत आहे. पण मग ते त्याचे लग्न लावतात. या यात्रेचे महत्त्व असे होते की लोक त्यांच्या आंतरिक कल्याणाचा शोध घेत सर्वत्र फिरत होते. जर एखाद्या माणसाला देशाच्या वेगवेगळ्या भागातून साधारणत: दोन ते तीन हजार किलोमीटर चालत जायचे असेल तर त्यासाठी त्यांना एका विशिष्ट उद्देशाच्या भावनेची आवश्यकता होती जो उद्देश त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता.

ते नेहमीच काशीला पायी जात असत आणि काशी अतिशय लांब असल्याने ते पुन्हा कधीच परत येत नसत. फार क्वचितच अशी लोकं होती जी काशीला गेली आणि प्रत्यक्षात पुन्हा परत आली. बाकीचे एका विशिष्ट वयात काशीला गेले आणि ते कधीच परत आले नाहीत. म्हणूनच आजही परंपरा अशी आहे की लोकांना काशीमध्ये मरावेसे वाटते. ही संपूर्ण प्रक्रिया सूचित करते की कोठेतरी, तुम्ही समजता की तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय जमा करून ठेवले आहे यात फरक आहे.

ओझे न बाळगता चालणे

तुम्हाला जर डोंगर चढून जायचे असेल तर, सामान जितके अधिक हलके असेल तितके चांगले. जरी तुमची इच्छा नसेल तरीही, तुम्ही जसे जसे धापा टाकायला लागता, तसे तुम्ही तुमच्याकडचे सामान फेकून द्याल. तुम्हाला काय फेकायचे त्याचा निर्णय तुम्हीच घ्या. मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु जे काही जास्त सामान आहे ते कृपया टाकून द्या कारण जास्त सामान घेऊन डोंगरावर जाणे खूप त्रासदायक ठरेल. हलके चाला, कारण हवा विरळ आहे, आणि जर तुम्ही खूप सामानाचे ओझे लादून चालत असाल तर तुम्ही चालू शकणार नाही. आज रात्री, झोपायच्या आधी, डोळे बंद करून फक्त स्वतःसाठी वेळ काढून किमान पाच मिनिटे शांतपणे बसा आणि तुमच्या बालपणापासूनच तुम्ही एकत्र केलेल्या सर्व गोष्टी नजरेसमोर आणा - विचारांमध्ये, भावनांमध्ये, गोष्टींमध्ये, लोकांमध्ये. तुम्हाला जे काही अतिरिक्त वाटत असेल ते तंबूच्या बाहेर फेकून द्या आणि उद्या सकाळी आपण पुढे चालायला लागू.

Web Title: Discard the extra burden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.