Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:48 IST2025-10-17T18:07:59+5:302025-10-17T20:48:48+5:30
Dhanteras 2025 Puja Vidhi: १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला सायंकाळी दिलेल्या मुहूर्तावर शुभ मंत्र म्हणत पूजा केल्यास विशेष लाभ होईल.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
Dhanteras 2015 Puja Vidhi: सण उत्सवाचा आनंद तेव्हाच द्विगुणित होतो, जेव्हा तुम्ही ते विधिवत आणि जुन्या-नव्या गोष्टींचा मेळ घालून साजरा करता. धनत्रयोदशी हा सण भगवान धन्वंतरी तसेच लक्ष्मी माता आणि कुबेर महाराज यांच्या पूजेचा! ती विधिवत व्हावी यासाठी शुभ मुहूर्त, शुभ मंत्र आणि पुजा विधी सविस्तर जाणून घ्या!
आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला साजरा होणारा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2025) सण दिवाळी उत्सवाचे मुख्य आकर्षण मानला जातो. या दिवशी देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांची जयंती असते. याच दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच, धनत्रयोदशीला धन्वंतरीसह माता लक्ष्मी, कुबेर देव यांची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे.
यंदा, १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार रोजी धनत्रयोदशी साजरी होत आहे. धन-समृद्धी आणि आरोग्याच्या या महत्त्वाच्या सणासाठी पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि विशेष मंत्र काय आहेत, याबाबत ज्योतिषी रवीशकुमार घांगुर्डे यांनी दिलेली माहिती खालीलप्रमाणे आहे:
धनत्रयोदशीची तारीख : १८ ऑक्टोबर २०२५, शनिवार
पूजा करण्याचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी ५.५७ नंतर
धनत्रयोदशीचे मुख्य नियम :
१. खरेदीचे महत्त्व: धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. ही खरेदी शुभ मुहूर्तावर करावी.
२. नैवेद्य : नवीन खरेदी केलेल्या भांड्यांमध्ये धणे भरून त्याची पूजा केली जाते. हे धणे दुसऱ्या दिवसापासून वापरण्याची प्रथा आहे.
३. दिवा प्रज्वलन (यमदीपदान): धनत्रयोदशीच्या दिवशी पिठामध्ये हळद मिसळून एक दिवा तयार केला जातो.
४. दीपदानाची दिशा: हा दिवा घराबाहेर प्रज्वलित करून त्याचे टोक दक्षिण दिशेकडे ठेवले जाते. असे केल्यास यमाची कृपा होते आणि अकाली मृत्यूचे भय टळते, अशी मान्यता आहे. यमदीपदानासाठी कणकेचे तेलाचे १३ दिवे प्रज्वलित करण्याचीही प्रथा आहे.
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
धनत्रयोदशी पूजा विधी : (Dhanteras Puja Vidhi 2025)
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर महाराज किंवा देवी महालक्ष्मी यांची विधीवत पूजा करावी. कुबेर महाराजांची पूजा का? कारण, त्यांना धनसंपत्तीचे प्रमुख मानले जाते. भगवान शंकरांनी त्यांना धनपतीचे वरदान दिले आहे. म्हणून धनप्राप्तीसाठी कुबेर महाराजांची पूजा केली जाते. तसेच धन्वंतरी हे आरोग्याची देवता आहेत. आपल्या घरात केवळ संपत्ती येऊन उपयोग नाही, तर ती उपभोगण्यासाठी चांगले आरोग्यही असायला हवे, म्हणून त्यांचीही पूजा. तसेच आपल्या घरातील धन-संपत्ती वृद्धिंगत व्हावी आणि लक्ष्मी चांगल्या मार्गानेच घरात यावी आणि कायमस्वरूपी स्थीर राहावी, म्हणून महालक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षता, धूप, दीप, चंदन, उटी, पाने, फुले, श्रीफळ देवाला अर्पण करून पुढील मंत्रांचे उच्चारण करावे.
कुबेर महाराजांच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र- ओम श्री, ओम ऱ्हीम, ओम ऱ्हीम, श्री क्लीं वित्तेश्वराय नम:।
धन्वंतरी पूजा मंत्र- ओम धन्वंतरये नम:।
पूजेच्या वेळी म्हणावयाचे श्लोक :
ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये:
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय
त्रिलोकपथाय, त्रिलोकनाथाय श्री महाविष्णूस्वरूप,
श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री श्री औषधचक्र नारायणाय नम:।
या देवी सर्वभुतेषु, लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नम: स्तस्यै, नम: स्तस्यै, नम: स्तस्यै नमो नम:।
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!