Deep Amavasya 2025: दीप अमावास्या 'अशीही' साजरी करता येऊ शकते, असा विचारही नसेल केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:05 IST2025-07-22T07:00:00+5:302025-07-22T07:05:01+5:30
Deep Amavasya 2025: यंदा २४ जुलै रोजी दिव्यांची आवस आहे, त्यादिवशी दिव्यांची पुजा तर करायचीच आहे, त्याबरोबर पुढील कल्पना साकारता आली तर?

Deep Amavasya 2025: दीप अमावास्या 'अशीही' साजरी करता येऊ शकते, असा विचारही नसेल केला!
स्वदेस चित्रपटातली ती आजी आठवते? जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर आपल्या बोळक्या तोंडाने ती आनंदून म्हणते, `बिजली...बिजली!' ही केवळ चित्रपटातील नाही, तर आजही अनेक खेडेगावत ही परिस्थिती आहे. एवढेच काय, तर अलीकडेच आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत आपण आपल्या परीने शक्य ती मदत करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकतेची, विश्वासाची आणि आशेची ज्योत प्रज्वलित करू शकतो. तसे केल्याने दीप अमावस्येचा मूळ हेतू म्हणजे अंधार नष्ट करणे, मग तो आपल्या आयुष्यातला असो नाहीतर दुसऱ्यांच्या आयुष्यातला, तो निश्चित साध्य होऊ शकेल.
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
सध्याच्या जगगात ट्यूबलाइट्स, बल्ब, सौरदिवे ही दिव्यांची आधुनिक रूपे आहेत. म्हणून असे दिवे एखाद्या संस्थेला, शाळांना, आश्रमांना द्यावेत. तशी आवश्यकता नसेल तर तेथील लाईट बिलाची रक्कम यथाशक्त अदा करावी. एखादा लामणदिवा, समई विकत घेऊन मंदिरात दान करावी आणि देवासमोर प्रज्वलित करावी.
आज आपल्या देशात शेकडो देवळे अशी आहेत की अनास्थेमुळे तिथे देवांची नित्यपूजा होत नाही. देवासमोर एखादा दिवासुद्धा कोणी लावत नाहीत. अशा आडगावच्या, आडवाटेच्या देवळात या दिवसाचे निमित्त साधून समविचारी मंडळींना सोबत घेऊन देवळाची स्वच्छता करावी. मूर्तीची पूजा करून दिवाबत्ती करावी. तुम्हाला तिथे रोज जाणे शक्य नसेल, तर तेथील गरजू स्थानिकाला या कामासाठी नेमून वर्षभराची दिवाबत्तीची सोय लावून द्यावी. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील व गरजू व्यक्तीला आर्थिक मदत मिळेल.
याचप्रमाणे कोणाच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावावा अशी इच्छा असेल, तर एखाद्या गरजू मुला-मुलीचा शैक्षणिक खर्च उचलावा. ती ज्ञानज्योत मुलांच्या मनात आयुष्यभर तेवत राहील व आपल्याला मदत मिळाली तशी भविष्यात कोणाला मदत करण्याची प्रेरणा त्यांना मिळू शकेल. शेवटी या उत्सवाचा सारांश काय, तर `ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो!'
यंदा २४ जुलै रोजी दीप अमावस्या(Deep Amavasya 2025) आहे, या दिवशी तुम्ही कोणाचे आयुष्य उजळवणार?