तुम्हाला मॉडेल व्हायचे की रोल मॉडेल हे तुम्हीच ठरवा, त्याआधी एक गोष्ट ऐका गौर गोपाल दास यांच्याकडून!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:11 PM2023-02-23T15:11:43+5:302023-02-23T15:12:14+5:30

त्रास, दुःख, यातना या दुष्ट चक्रातून प्रत्येकाला जावे लागते, पण त्या कठीण काळात आपण खचतो की घडतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. 

Decide whether you want to be a model or a role model, first hear a story from Gaur Gopal Das! | तुम्हाला मॉडेल व्हायचे की रोल मॉडेल हे तुम्हीच ठरवा, त्याआधी एक गोष्ट ऐका गौर गोपाल दास यांच्याकडून!

तुम्हाला मॉडेल व्हायचे की रोल मॉडेल हे तुम्हीच ठरवा, त्याआधी एक गोष्ट ऐका गौर गोपाल दास यांच्याकडून!

googlenewsNext

त्रास प्रत्येकाला होत असतो. परंतु, कोणाची सहनशक्ती जास्त असते, तर कोणाची कमी. जो सहनशक्ती वाढवतो, तोच घडत जातो. म्हणूनच मराठीत वाक्प्रचार  आहे, 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.' हेच गोष्टीतून पटवून देत आहेत, साधू गौर गोपाल दास...

एका मोठ्या शहराच्या मधोमध एक नामांकित वस्तुसंग्रहालय होते. त्या शहरातूनच नाही, तर जगभरातले पर्यटक त्या वस्तुसंग्रहालयाला भेट देत असत. संगमरवरी फरशीने आणि आरशांनी सजावट केलेले ते पांढरेशुभ्र वस्तुसंग्रहालय एखाद्या महालासारखे भव्य दिव्य वाटत असे. दर दिवशी हजारो लोक तिथे येत, तिथल्या वस्तुंचे कौतुक करत, फोटो काढत, भरभरून वर्णन करत. त्या संग्रहालयातली एक संगमरवरी मूर्ती सर्वांना आकर्षून घेत असे. खरे पाहता, त्या मूर्तीला पाहण्यासाठीच पर्यटकांची झुंबड होत असे. 

एके रात्री, ती मूर्ती सजीव झाली आणि बोलू लागली. तिच्या आवाजाने वस्तूसंग्रहालयाची पायरीसुद्धा बोलू लागली. दोघींमध्ये बराच वेळ संवाद झाला. शेवटी जाता जाता पायरीने आपले शल्य बोलून दाखवले. ती म्हणाली,

'तू आणि मी काही वेगळे नाही. आपण दोघी एकाच खाणीतून निघालो, एकाच हत्याराचे घाव होऊन, तोडमोड होत, एकाच ट्रकमधून इथवर आलो. परंतु, तुला मान मिळाला मूर्तीचा आणि मला मान मिळाला पायरीचा...! ही बाब मनाला अतिशय टोचत होती, तीच बोलून दाखवली. एकाच जातकुळीच्या असूनही लोक मला तुडवून जातात आणि तुला डोळेभरून पाहतात, हे सहन होत नाही.'

यावर मूर्ती म्हणाली, `बरे झाले बोललीस. पण थोडा मागचा काळ आठवून पहा. इथे पोहोचेपर्यंत तू म्हणालीस त्याप्रमाणे दोघींचा प्रवास सारखाच झाला. परंतु नंतर, इथल्या शिल्पकाराने मूर्ती घडवण्यासाठी आधी तुझी निवड केली, तेव्हा छिन्नीचे काही घाव पडताच, तुझे तुकडे पडले. तेव्हा तू आणखी थोडी सहनशक्ती दाखवली असतीस, तर आज माझ्या जागी तू असतील. मी मात्र, ते घाव सहन केले. संयम राखला आणि आज लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले.'

या गोष्टीतून आपल्या लक्षात येईल, की आपल्याही बाबतीत हेच घडते. अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. म्हणून, तुमच्या वाट्याला अनेक प्रकारची संकटे आली, तरी डगमगून जाऊ नका. संकटे म्हणजे छिन्नीचे घाव आहेत. तुमच्या आयुष्यातला अनावश्यक भाग छाटला जातोय, याचा आनंद बाळगा. अन्याय सहन करू नका, पण प्रसंगी अपमान पचवण्याची ताकद ठेवा. याच गोष्टी उद्या तुम्हाला केवळ मॉडेल नाही, तर `रोल मॉडेल' बनवणार आहेत. 

आता तुम्हीच ओळखा, आपली योग्यता 'पायरी' बनण्याची आहे, की 'मूर्ती'?

Web Title: Decide whether you want to be a model or a role model, first hear a story from Gaur Gopal Das!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.