दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:53 IST2025-12-03T13:52:44+5:302025-12-03T13:53:27+5:30

Datta Jayanti 2025 Marathi Datta Bavani: प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवल्याचे म्हटले जाते. कधी आणि कुणी म्हणावे दत्त बावनी स्तोत्र? जाणून घ्या...

datta jayanti 2025 only 5 minutes give to recite datta bavani marathi and be the recipient of immense grace of datta guru | दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!

दत्त जयंती २०२५: केवळ ५ मिनिटेच लागतील, ‘दत्त बावनी’ आवर्जून म्हणा; अपार कृपेचे धनी व्हा!

Datta Jayanti 2025 Marathi Datta Bavani: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा २०२५ मधील शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना, नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायक मानले जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली, अनेकदा दत्त उपासना करता येत नाही. अशा वेळेस किमान ५ मिनिटे काढावीत आणि दत्त बावनी अवश्य म्हणावी, असे म्हटले जाते. दत्त बावनी मराठीत असून म्हणायला एकदम सोपी आहे. 

दत्त उपासना सोपी नाही. श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे. दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र आहे. या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. हे स्तोत्र मराठीत उपलब्ध असून, पठण करण्यास सहज, सुलभ असेच आहे. दत्त बावन्नी एक दिव्य स्तोत्र मानले जाते. 

दत्त बावनी स्तोत्राचे महात्म्य अन् महत्त्व

दत्त संप्रदायातील महान अधिकारी प. प. टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य प. पू. रंगावधुत महाराज (नारेश्वर) यांनी १९३५ साली सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला दत्त स्तुती पर अद्भुत असे स्तोत्रं लिहिले. दत्तगुरूंनी कृपावंत होऊन पिशाच्च बाधा झालेल्या, आधी-व्याधीने ग्रस्त अश्या लक्ष्मी बेन त्रिपाठी यांच्या साठी पू. बापजीं कडून म्हणजे पू. रंगावधुत स्वामींच्या कडून ही दत्त बावन्नी लिहून घेतली. प. पू. रंगावधूत स्वामींना तुलसीदास ह्यांच्या हनुमान चालीसाप्रमाणे दत्त चालीसा स्तोत्र रचायचे होते. लिहिता लिहिता ५२ ओव्या झाल्या. प. पू. रंगावधूत स्वामींनी ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नांत असताना दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की, यातील एकही ओवी कमी करू नये. वर्षाचे आठवडे ५२, गुरुचरित्राचे अध्याय ५२ म्हणून ह्या स्तोत्राची ओळख "दत्त बावन्नी" अशी राहील, असे सांगितले जाते. 

दत्त बावनी स्तोत्र कधी म्हणावे?

प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरदहस्त ठेवला आहे. दत्त बावन्नी हे स्तोत्र कोणीही म्हटले तरी चालते. त्यास कोणतेही बंधन नाही. दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता. एखाद्या देवळात, एखाद्या मठांत, किंवा अगदी आपल्या घरी देवघरात बसून पण म्हणू शकता. दत्त बावन्नीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा. एकदा म्हणायला फक्त ४ ते ५ मिनिटे लागतात. तसेच सायंकाळी तिन्हीसांजेला दिवे लागणीवेळी पण घरी आपण म्हणू शकता. ज्या मुळे ज्ञात अज्ञात दुष्ट शक्तींचा नाश होऊन, घरांतील वातावरण मंगलमय होते. घरांत सुख-समाधान नांदते, असे म्हटले जाते. 

श्री दत्त बावन्नी मराठीत

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।  । १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद  ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

 

Web Title : दत्त जयंती २०२५: दैवीय कृपा के लिए दत्त बावन अवश्य पढ़ें!

Web Summary : दत्त जयंती पर, 52 छंदों वाली दत्त बावन का पाठ करना अत्यंत शुभ है। श्री रंग अवधूत महाराज द्वारा रचित, यह भगवान दत्तात्रेय से एक सरल लेकिन शक्तिशाली प्रार्थना है, जो आशीर्वाद प्रदान करने और बाधाओं को दूर करने के लिए मानी जाती है। शांति के लिए इसे सुबह और शाम पाठ करें।

Web Title : Datta Jayanti 2025: Recite Datta Bavani for Divine Grace!

Web Summary : On Datta Jayanti, reciting Datta Bavani, a 52-verse hymn, is highly auspicious. Composed by Shri Rang Avadhoot Maharaj, it's a simple yet powerful prayer to Lord Dattatreya, believed to grant blessings and remove obstacles. Recite it morning and evening for peace.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.