१० सेकंद लागतील, १ श्लोक म्हणा; संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभेल, शुभच तेच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:37 IST2025-12-03T14:36:38+5:302025-12-03T14:37:23+5:30
Datta Jayanti 2025: अगदी १० सेकंदात म्हणून होणारा एक श्लोक म्हणून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता.

१० सेकंद लागतील, १ श्लोक म्हणा; संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य लाभेल, शुभच तेच घडेल!
Datta Jayanti 2025: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा २०२५ मधील शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना, नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायक मानले जाते. सकाळी उठल्यावर अगदी ५ ते १० मिनिटांचा वेळ नसेल, तर अगदी १० सेकंदापेक्षा कमी कालावधीत म्हणून होणारा एक श्लोक म्हणून तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य प्राप्त करून घेऊ शकता. जाणून घ्या...
श्री गुरुचरित्र या ग्रंथाची महती सांगणारी अनेक विशेषणे अमृतघट, अमृताची पोई, संजीवनी, सुधारस, कामधेनू - वापरली गेली आहेत. या अक्षर ग्रंथाचे वाचन काही जण आपल्या प्रापंचिक आशा आकांशा पूर्ण करण्यासाठी करतात तर कुणी निरपेक्ष बुद्धीने निव्वळ सेवा म्हणून करतात. पारायणाला सुरुवात करताना मनात कुठलाही प्रापंचिक हेतू का असेना, जसजसे आपण एक एक दिवस अधिकाधिक वाचत जातो, तसतसा मनात वैराग्य भाव आपोआप निर्माण होत जातो. आपण श्रीगुरूंच्या चरित्र लीलांमध्ये इतके समरसून जातो की या पारायणातून काही साध्य करायचे होते याचाच विसर पडतो. श्री गुरुचरित्र रुपी कामधेनू जो जे वांछील तो ते लाहो हे वचन सत्य करतेच, पण त्याचबरोबर याचकाच्या झोळीत वैराग्याचे असे आंदण घालते की त्या याचकाचा मुमुक्षु आणि साधक कधी होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही.
एक श्लोकी गुरुचरित्र
४ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे. दत्त महाराजांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण होय. हे पारायण सात दिवसांचे किंवा तीन दिवसांचे सुद्धा करता येते. ऑफिस, व्यवसाय, आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण पारायणासाठी लागणारा वेळ आणि नियम पाळता येत नाहीत. सेवा करण्याची मनात तळमळ असूनही, वेळेअभावी किंवा नियमांमुळे पारायण होऊ शकत नाही. जर तुम्हाला मनापासून सेवा करायची असेल, तर यासाठी एक प्रभावी पर्याय आहे -तो म्हणजे 'एक श्लोकी गुरुचरित्र'.
एक श्लोकी गुरुचरित्र सेवा
या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे सार आहे. श्री गुरुचरित्रामध्ये ५२ अध्याय आहेत, आणि या ५२ अध्यायांचा सार केवळ या एका श्लोकामध्ये सामावलेले आहे. हा एक श्लोक म्हणण्यासाठी किंवा या सेवेसाठी एका मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो. या सेवेसाठी कोणीही पात्र आहे. दत्तगुरू महाराजांची कृपा हवी असलेले सर्वजण ही सेवा करू शकतात. तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य फल हवे असेल, तर तुम्ही ही 'एक श्लोकी गुरुचरित्र' सेवा नक्की करू शकता. तुम्ही रोज नित्य सेवेमध्ये हा श्लोक म्हणू शकता. तुम्ही ११ वेळा किंवा २१ वेळा म्हणू शकता. तुमची एखादी विशेष इच्छा असेल, तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. उदाहरणार्थ 'मी ११ दिवस रोज ११/२१ वेळा हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणेन', असा संकल्प करू शकता.
एक श्लोकी गुरुचरित्र सेवेचे नियम आणि वेळ
दत्त सेवा असल्यामुळे नित्य सेवेत हे करायचे असेल, तरी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. हा एक नियम तुम्हाला पाळावा लागेल. सूतक असताना ही सेवा करू नका. सकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेच नित्य सेवा म्हणून करू शकता. दिवसभरात तुमच्या वेळेनुसार जेव्हा शक्य असेल तेव्हा करू शकता. सायंकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, तेव्हा देवासमोर दिवा अगरबत्ती करून ही सेवा करू शकता. नोकरीचा त्रास, नजरदोष, बाह्य बाधा, घरातील भांडणे, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, घरात आजारपण किंवा रोगराई-तुमचा कोणताही प्रश्न किंवा समस्या असली तरी ती या सेवेने सुटू शकते. जगात अशी कोणतीही समस्या नाही, जी दत्तगुरू महाराजांना शरण गेल्यावर, गुरुचरित्र पारायण केल्यानंतर सुटणार नाही.
दत्त गुरूंवर मनापासून विश्वास, श्रद्धा ठेवा
तुमच्या मनात महाराजांवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि मनापासून तळमळ हवी. समस्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांशी शेअर करू नका; ते तुमचे ऐकतील आणि त्यावर हसतील. त्याऐवजी, तुम्ही ज्या देवांना किंवा गुरूंना मानता, त्यांच्याजवळ दुःख सांगा, ते नक्कीच मार्ग दाखवतील. जर दत्तगुरू महाराजांना पूर्ण शरण जाऊन, समर्पण वृत्तीने, मनापासून श्रद्धा आणि विश्वासाच्या बळावर सेवा केली, तर ते २१ दिवस सोडा, एका तासातही अनुभव देतील, असे सांगितले जाते.
श्री एकःश्लोकी गुरुचरित्र
दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपादपीठापुरी ॥
त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती कारंजग्रामांतरीं ॥
तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा ॥
तेथुनि मठ गाणगापुरि वसे वारी दीनांच्या श्रमा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.