Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:38 IST2025-08-16T09:37:13+5:302025-08-16T09:38:34+5:30
Dahi Handi 2025: गोपाळ काला हा आपण गोपाळकृष्णाचा प्रसाद म्हणून सेवन करतो, पण तो हातात घेऊन खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत हेही जाणून घ्या.

Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
गोपाळजन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात. आज १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला(Dahi Handi 2025) आहे. त्यावेळी गोपाळकाल्याचा प्रसाद वाटला जातो. मात्र तो खाऊन झाल्यावर हात पाण्याने धुवू नये अशी अट घातली जाते. तसे सांगण्यामागे नेमके काय, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर यांनी चितारलेला गोपाळकाला पाहू, म्हणजे वरील प्रश्नाचे उत्तर ओघाने मिळेलच!
गाईंना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यांसह बाळकृष्ण रानात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हैदोस घाली. खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भूकेची जाणीव होई आणि मग जेवण्यासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात. काकुळतीला येऊन कृष्णसख्याला विनवीत,
कान्होबा खेळ पुरे आता, मांडू रे काला, आवडी अनंता!
कृष्णाला काय तेच हवे असे. मग तोही काल्यासाठी तयार होई. सगळे मग धावत कदंबाखाली येत. तिथली जागा झटपट साफ करून रिंगण करून बसत. सगळे आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत. कृष्ण त्या मन लावून एकत्र करी. काय काय असे त्या शिदोरीमध्ये?
आणिती शिदोऱ्या आपापल्या,
जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या,
शिळ्या विटक्या भाकरी, दही भात लोणी,
मेळवोनी मेळा करी चक्रपाणी,
एका जनार्दनी अवघ्या देतो कवळ,
ठकविले तेणे ब्रह्मादी सकळ।
कोणी रात्रीची भाकरी, कांदा, चटणी आणलेली असे. तर कोणाचा दहीभात असे, कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे. तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरादेखील शिल्लक ठेवीत नसे. तो आधी ते सारे पदार्थ एक करी. मग सगळ्या सवंगड्यांना त्याचे समान वाटप करीत असे. मध्येच एखाद्याला आपल्या हाताने घास भरवीत असे. मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातो घास भरवी. अन तोही तो घास मोठ्या आवडीने गट्टम करत असे.
एकमेकांना पहले आप, पहले आप असा आग्रहदेखील होई. प्रत्येकाशी समानतेची वागणूक कशी असावी, समता-समानता म्हणजे काय ते कृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले. नाथ महाराज लिहितात-
वैकुंठीचा हरी, गोपवेष धरी, घेऊनि शिदोरी, जाय वना।
धाकुले सवंगडे, संगती बरवा, ठाई ठाई ठेवा, गोधनाचा।
बाळ ब्रह्मचारी, वाजरी मोहरी, घेताती हुंबरी, एकमेका।
दहीभात भाकरी, लोणचे परोपरी, आपण श्रीहरी वाढते।
श्रीहरी वाढले, गोपाळ जेवले, उच्छिष्ट सेवले, एकाजनार्दनी।
कृष्णाचा रुबाब काय विचारता? एकाने आपल्या कांबळ्याची घडी करून ती खास कृष्णासाठी अंथरली. त्यावर प्रेमपूर्वक बसवले. अन एकेकजण एकेक घास त्याला भरवू लागला. मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एकेक घास प्रेमपूर्वक त्यांना भरवला. असा प्रत्येकाला घास भरवून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असत ती तो स्वत: चाटूनपुसून साफ करीत होता. अन्न हे परब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते. हा काल्याचा प्रसाद त्यांनाच, जे कृष्णावर जीवापाड प्रेम करत असत. मात्र जे देव, गंधर्व हा प्रसाद, काला खाण्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे...
उच्छिष्टांचे मिशे देव जळी झाले मासे,
हे कळले घननिळा, सांगतसे गोपाळा।
याचाच अर्थ, की काला खाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रुपाने आलेल्या देवगणांना मिळणार, म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले, 'काला खाऊन झाल्यावर हात धुवत बसू नका तर जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका!'
तेव्हापासून गोपाळकाल्याचा प्रसाद खाल्यावर हात धुवू नये अशी प्रथाच पडली. प्रसाद मिळण्यासाठी भाग्य बलवत्तर असावे लागते. गोप-गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ, त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या कृष्णाचे सान्निध्यही मिळे. असे सुखाचे कण आपल्याही वाट्याला यावे असे वाटत असेल तर निस्सिम कृष्णभक्तीला पर्याय नाही!