Astrology: अमावस्येदरम्यान वाढतो शारीरिक, मानसिक ताण? ग्रहस्थिती जबाबदार की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:51 IST2025-11-20T15:48:57+5:302025-11-20T15:51:43+5:30
Astrology: अनेकांना अमावस्या-पौर्णिमा येताच शारीरिक, मानसिक ताण जाणवतो, तसे का होते, याचे उत्तर ज्योतिष शास्त्रात सापडते.

Astrology: अमावस्येदरम्यान वाढतो शारीरिक, मानसिक ताण? ग्रहस्थिती जबाबदार की आणखी काही?
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे आढळतात, जिथे काही व्यक्ती पौर्णिमा किंवा अमावस्या जवळ आली की अधिक मानसिक त्रास अनुभवतात. जोरजोरात ओरडणे, घरात भांडणे, किंवा अनामिक भीती आणि तणाव जाणवणे – यामागे अनेकदा ग्रहांचे सूक्ष्म खेळ दडलेले असतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. हा केवळ 'खेळ सावल्यांचा' नसून, तो आपल्या मनावर, कुंडलीवर आणि पूर्वजांच्या कर्मांवर अवलंबून असतो.
२१ नोव्हेंबर, मार्गशीर्ष मास; देवदिवाळी, नागदिवाळी, महालक्ष्मी व्रत, दत्त जयंती व्रत वैकल्याचा महिना
मनाचा कारक चंद्र आणि ग्रहांचे अधिराज्य
मनुष्याच्या मनाचा कारक ग्रह चंद्र (Moon) आहे. कुंडलीत चंद्र कमकुवत असेल, तर मन:स्वास्थ्य बिघडलेले असतेच, पण जेव्हा या चंद्राचा संबंध बलवान शनी (Saturn) आणि राहू (Rahu) सोबत येतो, तेव्हा पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी हा त्रास अधिक वाढतो. चंद्र कमकुवत झाल्यावर व्यक्तीला अनामिक भीती, भयगंड, एकटे राहणे असह्य वाटणे, विचित्र स्वप्ने (ओसाड घरे, साप) पडणे, छातीत धडधडणे आणि अस्थिरता जाणवते. राहू असे आभास आणि भास निर्माण करतो, ज्यामुळे विचारांची शक्ती खुंटते आणि मती सुन्न होते.
राहू: भोग आणि घराण्याचा शाप
राहूला ज्योतिषशास्त्रात सर्वात बलाढ्य शक्ती मानले जाते. राहू हा पृथ्वीवरील कोणाचाही मित्र नाही; तो सूडबुद्धीने काम करतो. पत्रिकेत जेव्हा राहू चंद्रासोबत युती करतो, तेव्हा त्याचे फळ वाईटच मिळते. राहू हा अनेकदा घराण्याचा शाप किंवा पूर्वजांचे ऋण घेऊन येतो.
ज्याप्रमाणे पिढीजात संपत्ती आणि वारसा हक्क मिळतो, त्याचप्रमाणे पूर्वजांनी केलेल्या चुकांचे तळतळाट आणि शापसुद्धा पुढच्या पिढीला भोगावे लागतात असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. मग ते अविवाहित राहणे असो, दीर्घ आजार असो, जमिनीसाठी झालेले अनैतिक व्यवहार असोत किंवा एखाद्या विधवा स्त्रीचे मन दुखावणे असो. एका तोंडाचा घास काढून घेताना वाटणारा आसुरी आनंद पुढे न संपणाऱ्या भोगांना जन्म देतो, ज्यातून सुटका नाही. परिणामांची भीती न बाळगता केलेली कृत्ये कधीतरी राहू-शनीच्या रूपात समोर उभी राहतात आणि आपल्याला आठवण करून देण्यासाठी शारीरिक-मानसिक पीडा देतात.
शांतीसाठी उपाय
या अनिष्ट काळातून मानसिक बळ मिळवण्यासाठी तसेच पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कुळाचार आणि श्रद्धा: आपण ज्या कुळात जन्माला आलो आहोत, त्याचे ऋण म्हणून कुळाचार पाळलेच पाहिजेत. श्राद्धपक्षात आणि पितृ पक्षात पान ठेवणे हा पितरांचा सन्मान आणि आशीर्वाद मिळवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.
आध्यात्मिक आधार: या काळात सद्गुरूंचा आधार घ्यावा. दत्त बावनी, श्री गजानन विजय ग्रंथाचे नित्य पठण, स्वामी समर्थांचा तारक मंत्र, श्री रामाचा जप केल्याने मानसिक बळ मिळते.
देवदिवाळी २०२५: कशी साजरी करतात देवदिवाळी? काय असतो नैवेद्य आणि कोणत्या देवांची होते पूजा? वाचा
नित्य विधी: रोज घरात देवाचे पूजन करावे. शनिवारी गोमूत्र आणि हळद यांनी उंबरठा सारवावा. रोज धूप, दीप आणि कापूर लावावा. चंद्राची दाने म्हणून ११ सोमवार शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करावे.
आचरण: घरातील स्त्रीचा सन्मान करावा आणि कोणाचेही मन दुखवू नये. सूडबुद्धी आणि द्वेषाचे दुष्टचक्र तोडावे. पैशाचा अपव्यय टाळावा आणि नित्य दानधर्म करावा.
भोग अटळ आहेत; ते भोगूनच संपवावे लागतात. म्हणूनच, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या युक्तीला धरून, आपण माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागले पाहिजे. सूडबुद्धीने समोरच्याला संपवण्याऐवजी आपण स्वतःलाच संपवत असतो, याचा विचार करा आणि वरील उपासना करून शारीरिक, मानसिक त्रासातून सुटकेसाठी अध्यात्मिक ताकद प्राप्त करा.
संपर्क: asmitadixit50@gmail.com