Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:41 IST2025-05-17T16:39:27+5:302025-05-17T16:41:58+5:30

Astro Tips: केवळ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नाही, तर मुलांच्या करिअरचे, आयुष्याचे सोने व्हावे यासाठी ज्योतिषांकडून ग्रहदशा जाणून घेणे योग्य ठरेल; कारण... 

Astro Tips: It is best for parents to decide their children's careers after knowing the planetary positions when their children reach 10th or 12th grade! | Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!

Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!

>>अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

१० वी १२ वी चे निकाल लागले, की पुढे काय करायचे? सायन्स की अजून काही? ह्याची चर्चा आजकाल अपत्य चौथी पाचवी मध्ये असतानाच केली जाते . एक उदा आवर्जून द्यावेसे वाटते. माझ्या ओळखीत एका मुलाने १० वी नंतर सायन्सला प्रवेश घेतला. मी त्याला सहज विचारले, सायन्स घेऊन पुढे काय करणार? तर म्हणाला “ आईने सांगितले आहे तू इंजिनिअर व्हायचेस''. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच आनंद ते सांगताना मला दिसला नाही. त्या वर्षी हा मुलगा सलग १० दिवस सुद्धा कॉलेजला गेला नाही. पुढील वर्षी कॉमर्स घेतले आणि पुढे  BCom झाला . पालकांचा पैसा फुकट गेला तेही एकवेळ ठीक, पण त्या मुलाचे आयुष्यातील एक वर्ष गेले त्याला कोण जबाबदार? आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मुलांनी पूर्ण कराव्यात हा अट्टाहास का? 

अनेकदा बाळ जन्माला आले की लगेच त्याला कुठल्या शाळेत आणि माध्यमात घालायचे इथपासून ते त्याने काय व्हावे डॉक्टर की इंजिनिअर इथवर घरच्यांमध्ये जणू चर्चेला ऊत येतो. पण काहीही म्हणा शिक्षण आणि शैक्षणिक वर्ष ही आयुष्यातील फार महत्वाची वर्षे असतात. उत्तम शिक्षण व्यक्तीला माणूस म्हणून घडवत असते. 

ह्या सर्वात जर आपण आपल्या पत्रिकेतील ग्रहांचा किती सपोर्ट आहे किंवा त्यांना कुठली दिशा आपल्याला दाखवायची आहे हे समजून घेतले तर पुढील सर्वच अगदी सोपे होवून जाते. निसर्गाने माणसाला दिलेली देणगी म्हणजे “ बुद्धिमत्ता “ . बुद्धी म्हंटली की बुध आलाच. बुध हा पृथ्वी तत्वाचा ग्रह आहे आणि धरून ठेवणे किंवा संचय करणे हे पृथ्वी तत्वाचे प्रमुख अंग आहे. बुध हे पृथ्वीचे आवरण आहे तसेच शरीराचे सुद्धा. पृथ्वी आपल्या पोटात असंख्य गोष्टी साठवून ठेवते . बुधाकडे असलेली ही धारणा  शक्ती त्याला शब्द संचय , आशय , माहिती  ह्याचा संचय करण्यास उपयोगी होते. बुधाकडे अंक , चातुर्य , शब्द , संवाद आणि लेखणी असल्यामुळे बुध पत्रिकेत उत्तम असेल तर व्यवहार ज्ञान, आकलन शक्ती असते. 

गुरु हा ज्ञानाचा कारक असल्यामुळे आणि त्याची व्यापकता प्रचंड ( आकाश तत्व ) असल्यामुळे चिंतन , ज्ञान , विवेक आणि प्रगल्भता गुरु देतो. आधुनिक काळातील हर्शल उत्तम संशोधक तयार करेल तर शनी सातत्य , शोध , सखोल ज्ञान देयील. ह्या सर्वासाठी मानसिकता चंद्र प्रदान करेल.  राहू ध्यास , अमर्याद कल्पनाशक्ती देईल . शनी राहू केतू बिघडले तर बुद्धीही बिघडू शकते . कुंभ , कन्या , मिथुन , तूळ आणि धनु ह्या राशीत ग्रह शुभ फळे देतील. अशा लोकांची शैक्षणिक पातळी उत्तम असेल. उत्तम शैक्षणिक स्त्रोत बुध , गुरूच तयार करू शकतात . 

लग्न आणि लग्नेश बलवान असावेत . पंचम भाव हा नवनिर्मितीचा , कल्पनाशक्तीचा आहे त्यामुळे पंचम भाव आणि त्यात केंद्रकोणाचे मालक आले तर सोने पे सुहागा . पंचमेश बुध , गुरु स्वराशीत उच्च नवमांशात असणे उत्तम . केंद्रात बुध गुरु कायद्यातील प्राविण्य देतील असे लोक उत्तम न्यायाधीश होतील.
आज १० वी आणि १२ वीचे निकाल लागत आहेत, अशावेळी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना पालकांनी विद्यार्थ्यांच्या पत्रिकेतील ग्रहांची कशी साथ आहे ते पहिले तर अधिकस्य अधिकम फलं .

घेतलेल्या शिक्षणाचा आणि करत असलेल्या नोकरीचा अनेकदा सुतराम संबंध नसतो, त्यामुळे घेतलेले शिक्षण तसे व्यर्थच जाते . आजकाल अनेक पालकांना पाल्यासाठी शैक्षणिक विचार करताना खिसाही पाहावा लागतो इतके ते आवाक्याच्या बाहेर आहे .अनेकदा लोन घ्यावे लागते पण आपल्या पोटच्या मुलांना आयुष्यात उभे करण्यासाठी अनेकदा PPF चा आधार घेताना दिसतात . कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा ह्यावर एकमत नसते आणि मुलांनाही तो आत्मविश्वास नसतो. अशावेळी हे ग्रह आपल्या मदतीला निश्चित धावून येतात . सारासार विचार करा ज्याच्या पत्रिकेतील बुध बिघडला आहे तर तो CA होऊशकेल का? आपल्यातील अनेक गुण आपण काय शिक्षण घेवू शकतो ह्याकडे ग्वाही देतात . कुटुंब भावातील किंवा तृतीयातील राहू मिडिया , फोटोग्राफी , digital माध्यम ह्यात जाहिरात क्षेत्रात उत्तम काम करू शकतो . 

डॉक्टर व्हायचे आहे ? डॉक्टर हा समाजासाठी काम करतो म्हणजे पत्रिकेत सेवाभावी मातृत्व भाव देणारा लोकात लोकप्रिय असणारा म्हणून चंद्र बलवान हवा . सर्जरी म्हणून धैर्य आणि साहस देणारा मंगळ जोडीला हवा . बुद्धीचा कारक गुरु , सेवाभाव आणि लोक कल्याणाची वृत्ती देणारा गुरु , चिकाटी , सर्व स्थरात काम करण्यासाठी शनी हवाच हवा . रोगाचे निदान करण्यासाठी षष्ठ , अष्टम हवे . दशम भाव उद्योग शीलता , व्यावसायिक वृत्ती तसेच आरोग्य देणारा रवी बलवान हवा. मंगळ रवीचा दश्माशी संबंध तसेच ६ ८ १२ ह्या भावेशांचाही दशमाशी संबंध हवा . हर्शल संशोधन वृत्ती देयील, संशोधन करवेल. मानसोपचार तज्ञाला दुसर्याचे मन समजले पाहिजे त्यासाठी चंद्र , बुध गुरु पंचम भाव हवेत . ३ ९ १० ह्या भावांचा एकमेकांशी संबंध असेल तर प्रसिद्धी मिळते . केस स्टडी म्हणजेच संशोधनासाठी हर्शल हवा . 

चतुर्थ भाव हा शिक्षण दर्शवतो.  मातृस्थान आहे. प्राथमिक धडे आपल्याकडून आईच गिरवून घेत असते . शाळा महाविद्यालयीन शिक्षण चतुर्थ , पंचम आणि उच्च शिक्षण नवम भाव . पंचम हे ज्ञान आहे . ज्याला बुद्धी आहे त्याचे शिक्षण झालेले असेलच असे नाही आणि जो शिक्षित आहे तो ज्ञानी असेल असेही नाही. पंचमाची वेगळी ओळख ही अनुभूती देणारी आहे , पूर्व जन्म आणि ईश्वरी अनुसंधान म्हणजे पंचम भाव. इथे फक्त पुस्तकी ज्ञान नसून इथे परमेश्वराचे सानिध्य आहे. परमात्म्याशी एकरूपता पंचम सूचित करते .

शिक्षण चालू असताना त्या वयात चतुर्थ , पंचम , नवम , लाभ ह्या भावांच्या दशा असतील तर शिक्षणासाठी पूरक अत्यंत अनुकूल ग्रहस्थिती असते. षष्ठ भाव हा आजकालच्या स्पर्धात्मक परीक्षांचा आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात तृतीय  भावाशी संबंधित दशा अंतर्दशा शिक्षणात अडथळे आणतात . मुले सतत घराबाहेर राहतात , शिक्षणाकडे दुर्लक्ष्य होते . त्यात राहूची दशा असेल तर मोबाईल हेच त्यांचे जीवन असते . अनुभव येतच असतील अनेक वाचकाना ह्याचे .
एरो स्पेस मध्ये इंजिनिअरिंग हा आजचा करिअर ऑप्शन आहे. त्यासाठी वायुतत्व आणि त्याच्या राशी मिथुन तुळा कुंभ पत्रिकेत बघा , बुध शुक्र मंगळ आणि अर्थात शनीही त्याचसोबत ह्या ३ ९ १२ ८ भावांच्या दशा हव्यात . तबला शिकायचा आहे मग कला दर्शवणारे पंचम ,तबल्या वरून फिरतात ती बोटे म्हणजे बुध आणि मिथुन राशीही आली , तृतीय भाव तसेच ह्या कलेतून लाभ मिळवून देणारे लाभ स्थान पाहिजे आणि त्यानुसार दशा . कॉम्पुटर सायन्स  गुरु शनी बुध आणि मिथुन धनु कन्या मीन राशी आणि ३ ९ ११ ४ दशा पहा . नाट्य चित्रपटात काम करायचे आहे तर प्रथम पंचम कला आणि तृतीय प्रसिद्धी मिळवून देणारे भाव तसेच प्रामुख्याने चंद्र शुक्र बुध पाहावेत . बांधकाम क्षेत्रात काम करायचे असेल तर मंगळ शनी बुध चंद्रही हवा कारण जनसंपर्क आहे सोबत आणि ४, १०, ११ भाव हवेत .

प्रत्येक ग्रहाचे आणि भावाचे कारकत्व माहिती असेल तर कुठल्या क्षेत्रात कुठले भाव आणि ग्रह उत्तम काम करतील ते सहज लक्षात येईल.  एखादी घटना घडवण्याचे संपूर्ण अधिकार दशा स्वामीकडे आहे . म्हणूनच पूरक दशा नसेल तर कितीही डोके आपटले तरी काहीच होणार नाही कारण दशा स्वामीची नसलेली मंजुरी . म्हणूनच आयुष्यात योग्य वेळी योग्य दशा असणे हे भाग्याचेच लक्षण असते . 

आपले स्वतःचे ज्ञान स्वानुभवातून फुलत जाते हे नक्की . लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या शिक्षणातून योग्य अर्थार्जन झाले पाहिजेच पण समाजासाठी सुद्धा आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे .डॉक्टराना समाजात एक दर्जा मान असतो आणि त्यासाठी सुद्धा त्यांचे तृतीय दशम भाव उत्तम हवा .
रवी हा राज्यकर्ता आहे म्हणजेच प्रशासक आहे म्हणून MBA करायचे असेल तर दशम भाव तसेच रवी उत्तम हवा . उच्च शिक्षणासाठी नवम भाव आणि परदेशात जावून शिक्षण घेण्यासाठी ९ १२ हे भाव हवेत . दशम भावात रवी असेल किंवा षष्ठ भावात दशमेश रवी असेल तर सरकारी नोकरी मिळण्याचे योग असतात . 

थोडक्यात, घेतलेले शिक्षण हे आपल्याला आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होते . प्रत्येक वेळेस पदवी मिळालेले शिक्षण ह्यासाठी लागते असेही नाही. एखादी गृहिणी खूप शिकलेली नसेल पण उत्तम स्वयंपाक येत असेल तर घरातून  खानावळ चालवू शकते , कला असेल तर उत्तम रांगोळी , कलेच्या वस्तू बनवून विकता येतील. प्रत्येक गोष्टीसाठी निर्णायक ग्रहांची मांदियाळी जमली तर स्वकष्टार्जित धन मिळवून स्वावलंबी होण्यास मदत होते .

आजकालची पिढी समंजस आहे , शिक्षित आहे , स्वतंत्र विचारसरणी आहे ज्याचा आपण विचार आणि स्वागत केले पाहिजे नाहीतर त्या ३ idiot मधल्या मुलाचे झाले तसे व्हायचे . सचिन तेंडूलकरच्या  घरच्यांनी त्याचे खेळातील स्कील , त्याची आवड ,  त्यातील कौशल्य वेळीस जाणले आणि त्याला खतपाणी घातले , प्रोत्साहन दिले म्हणून आज जगाला एक उत्तम क्रिकेट पटू मिळाला ज्याने भारत देशाचे नाव जगात मोठे केले . मुलांना त्यांचे आयुष्य जगू द्या , त्यांची आवड , कल लक्ष्यात घ्या , शेवटी शिक्षण आणि आयुष्य त्यांचे आहे . मी डॉक्टर झालो नाही म्हणून माझ्या मुलाने डॉक्टर झाले पाहिजे हा मुर्ख अट्टाहास सोडून द्या` . आपल्या इच्छा मुलांवर लादू नका. मुलांना त्यांच्या विचाराने जगू द्या , २ वेळा पडतील त्यांना आधार द्या. आपणही चुकून चुकून शिकलो आहोत तशीच तीही शिकतील. पडतील ठेच लागेल  पण ह्यातून एक उत्तम माणूस म्हणून घडतील ज्याचा पुढे जावून तुम्हालाच अभिमान वाटेल , आनंद होईल. “ मुलाकडे चाललो अमेरिकेला “ असे अभिमानाने भविष्यात तुम्हीच बोलणार आहात मग . 

नुसते शिक्षण नाही तर त्यातून अर्थार्जनाचे मार्ग मिळाले पाहिजेत . अनेकदा शिक्षण वेगळे आणि नोकरीचे कार्यक्षेत्र वेगळे असे होते . ९०% लोक आज जी नोकरी करतात त्याचा घेतलेल्या शिक्षणाशी सुतराम संबंध नसतो. म्हणून अनेकदा ज्या विषयात नोकरी मिळेल ते शिक्षण घ्या असे होते आणि आपली आवड , आपले स्कील बाजूला राहतात .

पण आज शिक्षणाचे क्षितीज रुंदावले आहे. रोज नवनवीन कोर्सेस , अभ्यासक्रम येत आहेत , परदेशी जावून शिकण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी बँका सुद्धा विद्यार्थ्यांच्या ह्या स्वप्नपूर्ती साठी , लोन देण्यास सज्ज आहेत. मुलांना गरज आहे तुमच्या सकारात्मक दोन शब्दांची , मानसिक आधाराची आणि आभाळा इतक्या आशीर्वादांची पण त्यांना त्यांच्या भविष्याची दिशा स्वतःच्या आवडीने ठरवायला मदत करा , त्यांच्यावर हेच कर तेच कर ही जबरदस्ती नको . नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त मुलांमध्ये अनेक कला गुण असतात त्यातूनही पुढे ते अर्थार्जन करून स्वतःचे विश्व निर्माण करू शकतात आणि नेमके ह्याच गुणाकडे आपले दुर्लक्ष होते . एखादा उत्तम फोटोग्राफर होवू शकतो , स्पोर्ट मध्ये प्राविण्य मिळवू शकतो . योग्य वयात योग्य शिक्षणाची संधी मिळाली तर  आपल्या मुलांना आत्मविश्वासाचे पंख मिळतील उंचच उंच भरारी घेण्यासाठी . 

आपल्या मुलांचे आयुष्य घडवा पण इतर गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेण्यास आर्थिक हातभार लावला तर समाजाचा चेहराच बदलून जायील. आयुष्यातील प्रत्येक पावलावर ज्योतिष आहे कारण माणसाचे आयुष्य आणि ज्योतिष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक क्षणी आपण हे शास्त्र जगत असतो आपल्याही नकळत . सहमत ? १० वी , १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आभाळ भरून शुभेच्छा!

शुभं भवतु 

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: It is best for parents to decide their children's careers after knowing the planetary positions when their children reach 10th or 12th grade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.