कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:15 IST2025-10-03T16:15:06+5:302025-10-03T16:15:59+5:30
Kojagiri Sharad Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत महत्त्वाचे असून, महालक्ष्मी कृपेने धन-धान्य, ऐश्वर्य-वैभव, भाग्योदय-भरभराट होऊ शकते, असे म्हटले जाते.

कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
Kojagiri Sharad Purnima 2025: चातुर्मासातील अश्विन महिना सुरू आहेत. अश्विन महिन्याची पौर्णिमा शरद पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखली जाते. या दिवशी आवर्जून लक्ष्मी पूजन केले जाते. विजयादशमी म्हणजेच दसऱ्यानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे. वर्षभरात येणाऱ्या पौर्णिमांपैकी अश्विन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. परंतु, यंदा २०२५ च्या अश्विन कोजागरी शरद पौर्णिमेवर पंचक योगाची अशुभाची छाया आहे. जाणून घेऊया...
अश्विन पौर्णिमा शरद ऋतूत येत असल्यामुळे याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच 'नक्षत्राणामहं शशी' म्हणजे 'नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे', असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे.
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नवान्न पौर्णिमा । Kojagiri Navanna Purnima 2025 Significance
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून 'को जागर्ती'? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात.
कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याची परंपरा । Kojagiri Purnima 2025 Tradition
भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते, अशी मान्यता प्रचलित आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळले जाते.
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजनाचे महत्त्व । Kojagiri Sharad Purnima 2025 Laxmi Puja
कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीचे पूजन करून जागरण केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. कोजागरीला केलेले लक्ष्मी पूजन विशेष मानले जाते. लक्ष्मी देवीच्या आशिर्वादामुळे धन, धान्य, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णूसहस्रनाम आदींचे पठण करणे शुभ मानले जाते.
शरद पौर्णिमेला लक्ष्मीसह इंद्राचे पूजन । Kojagiri Purnima 2025 Laxmi Puja Importance
शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.
पंचक योगात कोजागरी पौर्णिमा । Kojagiri Sharad Purnima 2025 Date Shubh Muhurat
शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून २८ मिनिटांनी पंचक सुरू झाले आहे. कोजागरी पौर्णिमा सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी सुरू होत आहे. तर, मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९ वाजून १७ मिनिटांनी कोजागरी पौर्णिमा समाप्त होत आहे. तर याच दिवशी मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्तर रात्री ०१ वाजून २८ मिनिटांनी पंचक समाप्त होणार आहे. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अश्विन महिन्यातील कोजागरी शरद नवान्न पौर्णिमा मंगळवार, ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी करावी. तर, कोजागरीचे जागरण ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री करावे, असे सांगितले जात आहे.