Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:07 IST2025-07-04T17:07:23+5:302025-07-04T17:07:50+5:30

Ashadhi Ekadashi 2025: आई आजारी असली तरी घराचा कारभार खोळंबतो, मग देव झोपले तर विश्वाचा कारभार कोण चालवतो? सविस्तर वाचा...

Ashadhi Ekadashi 2025: Who takes care of the universe when Vishnu takes yoganidra during Chaturmasa? | Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

आषाढी एकादशीला(Ashadhi Ekadashi 2025) जिला आपण देवशयनी एकादशी(Devshayani Ekadashi 2025) म्हणतो, यंदा ती ६ जुलै रोजी आहे. इथून पुढे चातुर्मास(Chaturmas 2025) सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो. या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू योगनिद्रा घेतात आणि कार्तिकी एकादशीला(Kartiki Ekadashi 2025) झोपेतून जागे होतात, त्याला देवउठनी एकादशी म्हणतात. मात्र प्रश्न असा पडतो, की देव खरोखरच झोपतात का? ते झोपले तर हा विश्वाचा कारभार कोण पाहतं? चला जाणून घेऊया. 

Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

हिंदू धर्मात एकादशीच्या तिथीला खूप महत्त्व आहे. ही तिथी महिन्यातून दोनदा येते, पण निर्जला, देवशयनी आणि देवोत्थान एकादशी या तिथी फार महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. यावेळी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी रविवार ६ जुलै रोजी येत आहे. याला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी चार महिने निद्रावस्थेत जातात असे मानले जाते आणि चार महिन्यांची विश्रांती संपवून देवोत्थान एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला २ नोव्हेंबर रोजी जागे होतील असे मानले जाते. 

विष्णु झोपले तर विश्वाचा सांभाळ कोण करतं? तर... 

भगवान विष्णू या कालावधीत झोपत असले तर विश्वाचा पसारा कोण सांभाळतो? हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचेच उत्तर म्हणजे आपले ३३ कोटी देव. कोटी हे करोड नसून कोटी हे प्रकार या अर्थाने आहेत. भगवान विष्णूंनी या कालावधीत विश्रांती घेतली तरी इतर देव या काळात कार्यरत असतात म्हणून वैश्विक कार्य सुरळीतपणे सुरू असतात. जशी नोकरीत आपण रजा घेतली म्हणून ऑफिस काम थांबत नाही आणि सुटी संपल्यावर आपल्याला आपल्या वाटणीची कामे जशी करावी लागतात, तशीच भगवान विष्णू योगनिद्रा पूर्ण झाल्यावर पुनश्च कामात रुजू होतात. याकाळात भगवान शंकर तो पदभार सांभाळतात. श्रावण गाजवतात. मग गणपती बाप्पा घरोघरी जाऊन ख्याली खुशाली विचारतात. देवलोकी गेलेले पितर आपल्या वंशजांवर पाळत ठेवतात. त्यानंतर जगदंबा येते आणि सगळे आपापल्या कामाप्रती जागरूक आहेत ना, याची विचारपूस करत को जागर्ति कोजागिरी पर्यंत मुक्काम करते. दसरा होता होताच दिवाळीचे वेध लागतात आणि पाच दिवसांचा दीपोत्सव झाला की प्रबोधिनी एकादशीला भगवंत आपल्या कामावर पुनश्च रुजू होतोत.

Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!

चातुर्मासात शुभ कार्य होत नाहीत, कारण... 

मात्र भगवान महाविष्णू विश्वप्रमुख असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मंगल कार्य करता येत नाहीत. शुभ कार्यात त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सोहळा होतो आणि मग खोळंबलेली लग्न पार पडतात. 

केवळ लग्नच नाही तर मुंडण, ग्रहप्रवेश आदी सर्व प्रकारची शुभ कार्ये देखील या कालावधीत केली जात नाहीत. एकादशीपासून पुन्हा देवोत्थान सुरू होते. श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या, ज्यांना शाक भाजी असेही म्हणतात, ते टाळावे.

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!

योगनिद्रेचे महत्त्व

प्राचीन काळापासून गृहस्थ, संत, महात्मा, साधक चातुर्मासाकडे व्रत म्हणून पाहतात. योग, ध्यान यांचे त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असते, कारण यामुळे सुप्त शक्तींचे पुनर्जागरण होते आणि अक्षय ऊर्जा जमा होते. योगनिद्रेमुळे भगवान विष्णूंनाही ती ऊर्जा प्राप्त होते आणि ते जागृत झाल्यावर अधिक जोमाने विश्वकार्य करण्यासाठी अधिक सक्षम होतात अशी भक्तांची भावना असते. 

Web Title: Ashadhi Ekadashi 2025: Who takes care of the universe when Vishnu takes yoganidra during Chaturmasa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.