Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:17 IST2025-07-04T14:16:52+5:302025-07-04T14:17:45+5:30

Ashadhi Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही तरी घरी राहून विधिवत पूजा करता येईल. 

Ashadhi Ekadashi 2025: Perform the ritual worship of Ashadhi Ekadashi in this way; Know the fast rituals and auspicious times! | Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!

आषाढी एकादशीला(Ashadhi Ekadashi 2025) देवशयनी एकादशी(Devshayani Ekadashi 2025) म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान करतात. आपल्याला पंढरपुरात जाता आले नाही तरी घरच्या घरी आपण ही पूजा विधिवत करू शकतो. 

आषाढी एकादशीचे विधी(Ashadhi Ekadashi Puja Vidhi) : 

आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपास करावयाचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती असल्यास पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे, असा विधी आहे. 

आषाढी एकादशी पूजेचे नियम(Ashadhi Ekadashi Puja rules) : 

>> एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
>> घरातील देवी-देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूप-दीप लावून आरती करावी.
>> पूजा पूर्ण झाल्यावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्रनामाचा जप करा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करावा.
>> शेवटी श्री विष्णूची आरती करून, तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी.

Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!

आषाढी एकादशीचे शुभ मुहूर्त(Ashadhi Ekadashi Shubh Muhurat 2025) : 

ब्रह्म मुहूर्त – सकाळी ०४:०८ ते ०४:४९ पर्यंत
अभिजित मुहूर्त – दुपारी ११:५८ ते १२:५४ पर्यंत
विजय मुहूर्त – दुपारी ०२:४५ ते ०३:४० पर्यंत
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ७:२१ ते ०७:४२ पर्यंत
अमृत काल – दुपारी १२:५१ ते ०२:३८ पर्यंत
त्रिपुष्कर योग – रात्री ०९:१४ ते १०:४२ पर्यंत
रवि योग – सकाळी ०५:५६ ते रात्री १०:४२ पर्यंत

आषाढी एकादशीचे व्रत(Ashadhi Ekadashi Vrat 2025) : 

या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत. काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात. या साऱ्या व्रतांना 'गोविंदशयन व्रत' असे एकच नाव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे.

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!

पौराणिक कथा(Ashadhi Ekadashi Story) : 

फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुणराजाने कृपा केली. योग्यवेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले. मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली, तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करावी. 

Web Title: Ashadhi Ekadashi 2025: Perform the ritual worship of Ashadhi Ekadashi in this way; Know the fast rituals and auspicious times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.