Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:12 IST2025-07-05T15:11:37+5:302025-07-05T15:12:28+5:30
Ashadhi Ekadashi 2025: ज्यांना दर महिन्याला एकादशी व्रत सुरू करायचे आहे, त्यांनी आषाढीपासून दिलेले नियम पाळावे आणि व्रताचा लाभ घ्यावा!

Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे. त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी, म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात. याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते, त्यांनी आषाढी पासून या व्रताची सुरुवात करायला हवी. त्याबद्दल अधिक वाचा.
एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे. या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेयपान इ. गोष्टी व्यर्ज्य कराव्यात. यासाठी मनाचा निग्रह आवश्यक असतो. म्हणून एकादशीचा उपास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो. त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो.
एकादशीचा संकल्प:
या दिवशी `मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षय पूर्वक श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्रीपरमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहं करिष्ये' असा संकल्प उच्चारून ताम्हनात पाणी सोडावे आणि जितेंद्रिय होऊन श्रद्धाभक्तिपूर्वक व यथाविधी देवतांचे पूजन करावे. एकादशीस होम हवन करण्याची पद्धत नाही.
एकादशी व्रताची समाप्ती:
कोणत्याही वयात या व्रताची सुरुवात करता येते. मात्र हे व्रत ऐंशीव्या वर्षांपर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली, तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी.
एकादशीची नावे :
प्रत्येक मासात दोनदा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला २४ एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपास करतो. परंतु, दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली असतात. जसे की आज आमलकी एकादशी आहे. आजची एकादशी आवळ्याचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. अशा प्रकारे सर्व एकादशींचे पालन केले, तर आपल्याला तिथी, वार, नक्षत्र यांची माहिती राहते. तसेच संबंधित एकादशीला असलेली पूजा, व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो.
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत असे श्रेयस कुलकर्णी लिहितात.
आषाढी एकादशी जवळच आहे. ज्यांना एकादशी चे व्रत घ्यायचे आहे त्यांना सुरू करण्याचा हा दिवस उत्तम मानला गेला आहे.
१. एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारिरीक, आर्थिक, कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही.
२. एकादशी करणाराला संकटातसुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते.
३. एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव दैवतेशी जोडले जाणे.
४. एकादशी करणाराचे पूर्वकर्म शुद्ध होते.
५. एकादशी करणाराची एकाग्रता वाढते.
६. एकादशी करणाराला अन्नाची खा खा होत नाही, परिणामतः झोप सुद्धा परिसिमित राहते, विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन वाढते.
एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात. त्याने ती बारा वर्षे प्रतिवर्ष चोवीस एकादशी केल्या होत्या. एकादशी व्रत हे राजा अंबरीष, राजा हरिश्चंद्र, राजा नल, राजा युधिष्ठिर यांनी केले आहे. आपण करून आपला उत्कर्ष साधूया.