१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:45 IST2025-07-03T14:42:57+5:302025-07-03T14:45:32+5:30

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला काही दिवस असले, तरी आताच्या घडीला पंढरपुरात लाखो भाविक आले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाल्याने आनंद, समाधान व्यक्त केले जात आहे.

ashadhi ekadashi 2025 it used to take 15 hours but now you can take vitthal darshan in just 5 hours lakhs of devotees in pandharpur | १५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

Vitthal Rukmini Temple Darshan: रविवार, ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे. मराठी वर्षांत चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. आताच्या घडीला लाखो भाविक पंढरपुरात असून, हळूहळू सगळे वारकरीही विठ्ठल दर्शन घेण्यासाठी पंढरपूर येथे जात आहेत. अशातच ज्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तब्बल १५ ते १६ तास लागत होते, त्याच विठुरायाचे दर्शन अवघ्या ५ तासांत घेणे शक्य होत असल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही आषाढी एकादशी यंदा विक्रमी होणार असे म्हटले जात आहे. आषाढी एकादशी सोहळ्याला अजून काहीसा अवधी असला तरी देवाच्या दर्शन रांगेतील भाविकांची संख्या दोन लाखापेक्षा जास्तवर गेलेली आहे. इतर वेळेला दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असताना भाविकांना १५ ते १६ तास इतका वेळ दर्शनाला लागत असे. यंदा मात्र व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे भाविकांचा दर्शनाचा १५ तासांचा वेळ केवळ पाच ते सात तासांवर आल्याचे सांगितले जात आहे. 

आषाढीत पंढरपूरमध्ये व्हीआयपी पासला बंदी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास बंद करण्यात आला आहे.  श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ‘व्हीआयपी’ पास घेऊन दर्शन घेतात. परिणामी दर्शनरांगेतील भाविकांना मात्र तासन् तास थांबावे लागते. यामध्ये अनेकजण मंत्री किंवा अन्य लोकप्रतिनिधींची शिफारस घेऊनही ‘व्हीआयपी’ म्हणून शिरकाव करतात. यामुळे सामान्य भाविकांना मात्र दर्शनासाठी तिष्ठत राहावे लागते. या पार्श्वभूमीवर व्हीआपी दर्शन पास बंद करण्यात आला आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

दर्शन रांगेवरील ताणही पूर्णपणे कमी झाला

व्हिआयपी पास बंद केल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. यंदाच्या आषाढीमध्ये आमचे व्हीआयपी फक्त वारकरी असतील ही भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आणि स्वतःही मुखदर्शन घेत आपण केलेला नियम पाळण्यास सुरुवात केली. १५ तासांचे दर्शन पाच तासात होऊ लागल्याने दर्शन रांगेवरील ताणही पूर्णपणे कमी झाला आहे. भाविकही आता अल्पावधीमध्ये देवाच्या चरणापर्यंत पोहोचू लागत असल्याने त्यांनाही हे दर्शन सुखकर होत आहे. 

दरम्यान, आषाढी यात्रेच्या काळात लाखो भाविक येत असतात. यामध्ये सामान्य भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ रांगेत थांबावे लागते. सामान्य भाविक तिष्ठत असताना, त्यांना त्रास सहन करावा लागत असताना अशा गर्दीच्या काळात अनेकजण त्यांच्या सोबतच्या लोकांसह ‘व्हीआयपी’ दर्शन पास घेत मध्येच घुसतात. हा प्रकार सामान्य भाविकांवर अन्याय करणारा तर असतोच शिवाय यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ शकतात. यामुळेच हा आदेश दिला असून याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

Web Title: ashadhi ekadashi 2025 it used to take 15 hours but now you can take vitthal darshan in just 5 hours lakhs of devotees in pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.