४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:44 IST2025-09-02T12:40:17+5:302025-09-02T12:44:21+5:30
Parivartini Ekadashi September 2025: भगवान श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते.

४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
Parivartini Ekadashi September 2025: चातुर्मास सुरू आहे. मराठी वर्षात प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत केले जाते. एकादशीचे व्रत श्रीविष्णूंना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी केलेले श्रीहरि विष्णूंचे पूजन अत्यंत पुण्यफल लाभदायी मानले जाते. भाद्रपद शुद्ध एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला तुळशीचा एक उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
यंदा, बुधवार, ०३ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही पद्मा एकादशी या नावानेही ओळखली जाते. या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला 'विजया एकादशी' असे म्हणतात. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विष्णुभक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते. एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. ज्यांना उपास करणे शक्य नसते, साधा सात्त्विक आहार घ्यावा, असे सांगितले जाते.
भाद्रपद परिवर्तन एकादशी २०२५ शुभ मुहूर्त कोणता?
भाद्रपद शुद्ध एकादशी मंगळवार, ०२ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०३ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होत आहे. तर, गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून २१ मिनिटांनी संपेल. भारतीय पंचांग पद्धतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवार, ०३ सप्टेंबर २०२५ रोजी परिवर्तिनी एकादशी व्रत करावे, असे सांगितले जात आहे. बुधवार, ०३ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण दिवस परिवर्तिनी एकादशी आहे. या दिवशी पूजेचा शुभ काळ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटे ते ९ वाजून १० पर्यंत असेल. या काळात श्रीहरी विष्णूंचे पूजन करता येऊ शकेल.
तुळशीचा उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा
- भगवान श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेत तुळशीचा समावेश अवश्य करावा. असे मानले जाते की, असे केल्याने भगवान श्रीविष्णू प्रसन्न होतात. पूजेचे पूर्ण पुण्य मिळू शकते. जीवनात सुरू असलेल्या समस्या, दुःख आणि संकटे दूर होऊ शकतात.
- परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. मंत्रांचा जप करावा. असे केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात, असे म्हटले जाते.
- आर्थिक समस्या असतील तर परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुळशीला गंगाजल अर्पण करावे. असे मानले जाते की, यामुळे आर्थिक समस्या दूर होतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.