२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:04 IST2026-01-13T09:01:41+5:302026-01-13T09:04:52+5:30
ShatTila Ekadashi 2026 Vrat Puja: २०२६ च्या पहिल्या षट्तिला एकादशी व्रताचरण कसे करावे? व्रत पूजा विधी, व्रत कथा जाणून घ्या...

२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
ShatTila Ekadashi 2026 Vrat Puja: इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू झाले आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की, पहिला मोठा सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर विविध स्वरुपात मकर संक्रांती साजरी केली जाते. यंदा २०२६ च्या मकर संक्रांतीला षट्तिला एकादशीचा योग जुळून आलेला आहे. सुमारे ११ वर्षांनी असा योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. २०२६ ची पहिली षट्तिला एकादशी कधी आहे? या षट्तिला एकादशीचे व्रत पूजन कसे करावे? षट्तिला एकादशीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूंचे पूजन आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पौष महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला षट्तिला एकादशी असे म्हटले जाते. एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते. अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात. प्रत्येक एकादशीचे नाव आणि त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे. यंदा, बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी षट्तिला एकादशी आली आहे.
निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे व्रत
पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, याबाबत सांगितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट्तिला एकादशी. निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत लाभदायक ठरते, असे म्हटले जाते.
षट्तिला एकादशी व्रत पूजन कसे करावे?
या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षट्तिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते. सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने श्रीविष्णूंचे पूजन करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.
षट्तिला एकादशी व्रत सांगता करण्याचा विधी
षट्तिला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
षट्तिला एकादशी व्रतकथा अवश्य पठण करा
षट्तिला एकादशीची व्रत कथा पद्म पुराणात आढळते. एक महिला विष्णूभक्त होती. तिने विष्णूंची उपासना केली. भक्ती केली. तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली. तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचे कारण विचारले. तेव्हा विष्णू तिला म्हणाले की, गत जन्मात तू केवळ उपासना केलीस, परंतु कधी कोणाला दान धर्म केला नाही. एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काही न देता विन्मुख पाठवले. तुझ्या पदरी दान धर्माचा पुण्य संचय कमी पडला म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी देवकन्या तुझ्या दाराशी येईल, तेव्हा तिला तिळाचे दान कर. अन्न दान श्रेष्ठ दान आहे. त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजे माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तुला वैकुंठ प्राप्ती होईल. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. म्हणून केवळ स्वतः साठी न जगता दुसऱ्यांना सहाय्य करा, यथाशक्ती दानधर्म करा. जेणेकरून विष्णूकृपेचा लाभ प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥