१७ वर्ष प्रभाव, बुध महादशेत देतो भरपूर पैसा; नोकरी-व्यवसायात होते भरभराट, पद-प्रतिष्ठा वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 08:23 IST2026-01-27T08:15:21+5:302026-01-27T08:23:09+5:30
17 Years Budh Mahadasha Prediction: बुध ग्रहाची कुंडलीतील स्थिती चांगली असेल, तर व्यक्ती कोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करू शकते? महादशेचा प्रभाव कसा असतो? जाणून घ्या...

१७ वर्ष प्रभाव, बुध महादशेत देतो भरपूर पैसा; नोकरी-व्यवसायात होते भरभराट, पद-प्रतिष्ठा वाढ!
17 Years Budh Mahadasha Prediction: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या सर्वांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल काही अंदाज वर्तवले जाऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून त्या व्यक्तीचे गुण-दोष, सकारात्मक-नकारात्मक बाजू, जीवनात घडणाऱ्या गोष्टींची भाकिते केली जाऊ शकतात. तसेच व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून ग्रहांची दशा, महादशा, अंतर्दशा, त्याचे होणारे परिणाम याचेही आखाडे बांधले जाऊ शकतात.
नक्षत्रांची मिळून रास तयार होत असते. नवग्रह राशींसह नक्षत्र गोचरही करत असतात. नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे वैशिष्ट्य, प्रभाव, परिणाम वेगवेगळे असतात. नवग्रहांतील प्रत्येक ग्रह महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह हा नवग्रहातील राजकुमार ग्रह मानला जातो. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास बुध ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वांत लहान ग्रह आहे. हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे. बुध ग्रहाला सौम्य, सोमपुत्र, चांद्र, रोहिणेय, राकेशसुत अशी नावे आहेत. इंग्रजीत मर्क्युरी म्हटले जाते.
१७ वर्षे असते बुधाची महादशा
बुध ग्रहाची महादशा १७ वर्षे असते, असे म्हटले जाते. मिथुन आणि कन्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे. कन्या ही बुधाची उच्च रास, मूलत्रिकोणी रास व स्वगृह मानले गेले आहे. याचाच अर्थ बुध कन्या राशीत सर्वाधिक, सर्वोत्तम फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. तर मीन ही बुधाची नीचरास आहे. म्हणजेच या राशीत बुध कमी बलवान, कमी फले देणारा ठरतो, असे म्हटले जाते. बुध हा शुभ ग्रह मानला गेला आहे. एका राशीत सुमारे महिनाभर बुध विराजमान असतो. बुधाचे रत्न पाचू असून, केशव म्हणजेच विष्णू याची देवता आहे. आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती या तीन नक्षत्रांचे स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. अंकशास्त्रात ५ या संख्येवर बुधाचे प्रभुत्व आहे. आठवड्यातील बुधवार या दिवसावर बुधाचा अंमल असून, भैरवनाथ ही बुधाची उपास्य देवता आहे. बुधामुळे भद्र नावाचा पंचमहापुरुष योग जुळून येतो. यामुळे जातक विद्वान व धनवान होतो, असे म्हटले जाते. रवि आणि चंद्रामुळे व्यक्तिमत्त्व कळते, तर बुधामुळे बुद्धिमत्ता व तिचे पैलू कळतात, असे म्हटले जाते. कुंडलीत रवि हा आत्मा, चंद्र हा मन असून, त्या खालोखाल बुद्धीला प्राधान्य आहे. बुद्धीवर बुधाचे प्रभुत्व आहे.
कुंडलीत बुध सकारात्मक असेल तर कोणत्या क्षेत्रात करिअर होते?
बुध ग्रह कुंडलीत शुभ स्थानावर असेल तर व्यक्ती व्यवसायात चांगले पैसे कमावते. याव्यतिरिक्त, ती व्यक्ती गणितात चांगली असते, चांगली तर्कशक्ती असते आणि थोडी विनोदी स्वभावाचीही असते. सकारात्मक बुध व्यक्तीला चांगला गुंतवणूकदार बनवतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये चांगले पैसे कमवतो. आयुष्यात भरपूर पैसा कमावतो. एवढेच नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही चांगली राहते. कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर ती व्यक्ती एक प्रमुख उद्योजक बनते. बिझनेस माइंडेड असतात. चांगले तर्क कौशल्य असते. वादविवाद आणि चर्चांमध्ये उत्कृष्ट ठरतो. अशा व्यक्ती एमबीए, गणित शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ म्हणून करिअर होऊ शकतात. बँकिंग क्षेत्रात चांगले नाव कमवू शकतात. हे लोक भविष्यासाठी चांगल्या योजना बनवतात, असे सांगितले जाते.
बुध ग्रह नकारात्मक किंवा अशुभ असेल तर...
कुंडलीत बुध ग्रह नकारात्मक किंवा अशुभ असेल तर बुधाच्या स्थितीमध्ये व्यक्तीला वाईट परिणाम मिळतात. अशा व्यक्तीला अनेक वेळा व्यवसाय बदलावा लागतो. व्यवसायात नुकसान होते. तसेच नाक, कान आणि त्वचेचे आजार होऊ शकतात. व्यक्तीच्या मावशी आणि मामांसोबतचे संबंध बिघडू शकतात. व्यक्तीला शेअर बाजारात नुकसान होऊ शकते. बुधची स्थिती कुंडलीत नकारात्मक असते, तेव्हा व्यक्तीची बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संवाद क्षमता कमकुवत होते, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.