पंक्चर काढताना सहकार्य करणाऱ्या युवकास दुचाकीने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:00 IST2019-06-18T15:56:22+5:302019-06-18T16:00:19+5:30
महामार्गावर जीप उभी करून पंक्चर काढणे बेतले जीवावर

पंक्चर काढताना सहकार्य करणाऱ्या युवकास दुचाकीने चिरडले
माजलगाव (बीड) : नादुरुस्त झालेल्या जीपचे रस्त्यावर पंक्चर काढताना चालकाला सहकार्य करणारा एक युवक दुचाकीच्या जोरदार धडकेत जागीच गतप्राण झाला. ही घटना मंगळवारी (दि. १८ ) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर जायकोवाडी शिवारात माऊली फाटा येथे घडली. किशोर शंकर कंकरे (२८,रा. भडंगवाडी ता. गेवराई ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर हा आज सकाळी गेवराईवरून माजलगावकडे एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये (क्रमांक एम एच 44 जी 2579) बसून जात होता. दरम्यान, माऊली फाट्याजवळ जीप अचानक पंक्चर झाली. यामुळे जीपचा चालक पंक्चर काढण्यासाठी खाली उतरला. त्याला मदत करण्यासाठी किशोरसुद्धा रस्त्यावर आला. दोघेही पंक्चर काढत असताना गेवराई कडून भरधाव वेगाने येत असलेल्या एका दुचाकीने ( एमएच 21 बी.ओ.0913 ) किशोरला जोरदार धडक दिली. धडकेत किशोरच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी दुचाकीस्वार सुद्धा गभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.