दुचाकी अपघातात कामगार युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 18:21 IST2019-11-29T18:19:50+5:302019-11-29T18:21:13+5:30
छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू

दुचाकी अपघातात कामगार युवक जागीच ठार
आष्टी : दोन दुचाकीच्या अपघातात एक कामगार युवक जागीच ठार झाल्याची घटना पंचायत समिती कार्यालयाजवळ दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. आसाराम बजरंग भारती (२४ ) असे मृत युवकाचे नाव असून तो शहरापासून जवळ असलेल्या कासारी येथील रहिवासी होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, कासारी येथील आसाराम भारती हा युवक आष्टी येथे एका हॉटेलमध्ये कामगार आहे. आज दुपारी तो कासारी येथून आष्टीकडे दुचाकीवर येत होता. नगर-बीड रोडवरील पंचायत समिती कार्यालयाजवळ त्याच्या दुचाकीची समोरच्या दुचाकीस जोराची धडक बसली. यात आसरामाच्या छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. नागरिकांनी उपचारासाठी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून आसरामला मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ बन्सी जायभाय हे करत आहेत.