उधार पैश्यावरुन मारहाण झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 14:15 IST2021-09-01T14:14:50+5:302021-09-01T14:15:25+5:30
सायंकाळी राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

उधार पैश्यावरुन मारहाण झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल
अंबाजोगाई : माझे पैसे का देत नाहीय असे म्हणत मारहाण केल्याच्या नैराश्यातून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.३०) अंबाजोगाईतील परळी वेस भागात उघडकीस आली. याप्रकरणी घाटनांदूरच्या एका तरूणावर गुन्हा नोंदविण्यात आला.
सुर्यकांत रमेश वैद्य (वय २५, रा. परळी वेस, अंबाजोगाई) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. सुर्यकांत आराध्याचे गायनाचे कार्यक्रम करत असे. सोमवारी (दि.३०) घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील महेश सतीश शिंगनाथ याने माझे पैसे का देत नाहीस असे म्हणत सुर्यकांतला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे खजील झालेला सुर्यकांत घरी आला. त्याच्या डोळ्याला लागलेला मार पाहून भाऊ दिनेशने त्याला त्याबाबत विचारले असता त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. आपण पैशाची व्यवस्था करू असे म्हणत दिनेशने सुर्यकांतची समजूत घातली.
परंतु, सुर्यकांत नैराश्यातून बाहेर आला नाही. अखेर त्याने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुर्यकांत घराचा दरवाजा उघडता नसल्याने दिनेशने खिडकी तोडून पाहिल्यानंतर त्याला ही घटना लक्षात आली. याप्रकरणी दिनेशच्या फिर्यादीवरून महेश शिंगनाथ याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.