ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 19:17 IST2025-11-07T19:16:59+5:302025-11-07T19:17:40+5:30
'आय लाईक यू!' पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग; अल्पवयीन तरुणावर 'पॉस्को'

ॲट्रॉसिटीचा कालचा फिर्यादी आज विनयभंग प्रकरणी 'पॉस्को'त आरोपी! जाणून घ्या दुहेरी प्रकरण
- मधुकर सिरसट
केज (बीड): पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच गावातील आणि महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणाकडून मनस्ताप आणि अत्याचाराचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. मैदानावर सराव करत असताना या १७ वर्षीय तरुणाने तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. ३) सकाळी ही अल्पवयीन पीडित तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत शेजारच्या गावातील मैदानावर पोलीस भरतीच्या तयारीचा सराव करत होती. त्याचवेळी तिच्या गावातील आणि त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा १७ वर्षीय तरुण दुचाकीवरून तेथे आला. तरुणाने थेट तरुणीच्या हाताला धरून ओढले आणि 'तू मला दहावीपासून आवडतेस, आय लाईक यू, तू माझ्यासोबत लग्न कर' असे बोलून तिचा विनयभंग केला.
करिअर बरबाद करण्याची धमकी
मुलीने त्याला 'तू मला आवडत नाहीस' असे सांगितल्यावर संतापलेल्या तरुणाने "तू जर मला नकार दिलास, तर मी तुझ्याबद्दल गावात अपप्रचार करून, तुझे करिअर खराब करीन," अशी धमकी दिली आणि तेथून पसार झाला. यापूर्वीही तो तिचा अनेक वेळा पाठलाग करत होता. घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन तरुणाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यासह विनयभंगाचा गुन्हा (भा.दं.वि.) नोंदवण्यात आला आहे.
कालचा फिर्यादी आज आरोपी!
या घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या या १७ वर्षीय तरुणाला एक दिवस आधी याच मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. मुलीला मोबाईल मेसेज का पाठवला, या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते, ज्याबद्दल तरुणाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही १७ वर्षांचे अल्पवयीन असल्याने, आरोपीला या प्रकरणात त्वरित अटक करता येत नाही. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे या दुहेरी गुन्ह्याचा आणि या नाट्यमय घडामोडींचा पुढील तपास करत आहेत.