Beed: खोटं बोलून पिवळं रेशनकार्ड; बनावट मजूर झालेल्या सरकारी नोकर पती-पत्नीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:27 IST2025-07-01T19:27:12+5:302025-07-01T19:27:30+5:30
सरकारी नोकरीत असूनही बनावट रेशनकार्ड; ‘गरीबी’ दाखवणाऱ्या आर्थिक सक्षम दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Beed: खोटं बोलून पिवळं रेशनकार्ड; बनावट मजूर झालेल्या सरकारी नोकर पती-पत्नीवर गुन्हा
बीड : सरकारी नोकरीत असूनही आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे नायब तहसीलदार प्रशांत एकनाथ सुपेकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
रवींद्र पुंजाजी भालशंकर आणि त्यांची पत्नी संगीता भालशंकर (माजी सहशिक्षिका) अशी आरोपींची नावे आहेत. रवींद्र भालशंकर पदवीधर असून, स्वतःची चारचाकी गाडी आहे, तर त्यांची पत्नी शासकीय सेवेत आहेत आणि त्यांचे स्वतःचे घर आहे. असे असतानाही, त्यांनी तहसील कार्यालयात खोटे स्वयंघोषणापत्र आणि बनावट तलाठी उत्पन्न दाखला सादर केला. या कागदपत्रांमध्ये त्यांनी स्वतःला मजूर आणि शेतकरी असल्याचे दाखवून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त १५ हजार रुपये असल्याचे नमूद केले.
या खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी गरजू कुटुंबांसाठी असलेल्या 'अंत्योदय अन्न योजने'चे पिवळे रेशनकार्ड मिळवले. या बनावट रेशनकार्डवर त्यांनी एप्रिल २०२३ पूर्वी शासनाकडून धान्य उचलले. या फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. याप्रकरणी रवींद्र आणि संगीता भालशंकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.