Walmik Karad : वाल्मीक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अडकणार? एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले; न्यायालयात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 19:05 IST2025-01-15T19:03:30+5:302025-01-15T19:05:11+5:30
Walmik Karad : वाल्मीक कराड याला आज कोर्टाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Walmik Karad : वाल्मीक कराड सरपंच देशमुख हत्या प्रकरणात अडकणार? एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले; न्यायालयात नेमकं काय घडलं?
Walmik Karad ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
मुंबई, पुण्यासह राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सुरु होणार; सरकारने कायदाच बनविला, दोन महिन्यांत...
वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले. यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
कोर्टात नेमकं काय घडलं?
अनेक वेळा अवादा कंपनीकडे खंडणी मागितली जात होती, पण कंपनीने दिली नाही. यावेळीच संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला. सरपंच देशमुख खंडणीमध्ये अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वा त्याच्यासह अन्य आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. यानंतर मारहाण करुन त्यांची हत्या केली. अपहरण केल्यानंतर विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांनी हत्येच्या आधी आणि नंतर एकमेकांना कॉल केले असल्याची माहिती सीडीआरमधून समोर आली आहे, अशी माहिती एसआयटीने कोर्टाला दिली.
तसेच २९ नोव्हेंबर आधी सुदर्शन घुले याने अवादा कंपनीचे काम बंद पाडले होते. कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलावून वाल्मीक कराड याने दोन कोटींचे खंडणी मागितली होती. २९ नोव्हेंबर रोजी कराड याने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची धमकी दिली होती. त्याचदिवशी सुदर्शन घुले याने कंपनीत जाऊन धमकी दिली होती. ६ डिसेंबर दिवशी पुन्हा घुले साथीदारांना घेऊन कंपनीत गेला, यावेळी गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण करुन शिवीगाळ केली.
गार्ड हा मस्साजोग गावचा रहिवासी आहे, त्या दिवशी सरपंच संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी विरोध केला, खंडणीला अडथळा ठरणाऱ्या संतोष देशमुख यांचा ९ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले याच्यासह साथीरांनी खून केला. या सर्व घटना होत असताना आरोपींच्या संपर्कात वाल्मीक कराड संपर्कात होतास असं सीडीआरवरुन दिसून आल्याचा दावा एसआयटीने आज कोर्टात केला.