नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:15 IST2025-11-08T19:12:33+5:302025-11-08T19:15:31+5:30
Manoj Jarange Patil Dhananjay Munde: हत्येची सुपारी दिल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्यानंतर मनोज जरांगेंनी थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे.

नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, थोतांड करू नका, माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा. मुंडेंच्या या मागणीनंतर मनोज जरांगेंनी थेट पोलीस अधीक्षकांना नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज दिला आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात मनोज जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केला. बीडमधील कांचन नावाच्या व्यक्तीचेही नाव जरांगेंनी घेतले. त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली.
जरांगेंनी केलेले आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळून लावले. ती मनोज जरांगे यांचीच माणसं आहेत, असे धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इतकंच नाही, तर मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगेेंच्या वतीने कुणी दिला अर्ज?
मनोज जरांगे यांनी आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज जालना पोलीस अधीक्षकांना अर्ज देण्यात आला आहे. जरांगेंच्या शिष्टमंडळाने हा अर्ज दिला आहे. आंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगेंच्या काही सहकाऱ्यांनी जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांना अर्ज दिला.
मनोज जरांगे हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेत. या प्रकरणातील सर्वांचीच नार्को टेस्ट करा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
मनोज जरांगे हत्या कट, दोन आरोपींना अटक
मनोज जरांगे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी गेवराई येथील अमोल खुणे आणि विवेक ऊर्फ दादा गरूड या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.