मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 07:58 IST2025-02-05T07:53:43+5:302025-02-05T07:58:24+5:30
फडणवीस-पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सोबत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.

मुंडे बहीण-भाऊ, सुरेश धस एकत्र येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज आष्टीत कार्यक्रम
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी निशाणा साधलेला आहे. अशातच आता धस यांच्या आष्टी मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी येत आहेत. यात प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांची नावे असली तरी मुंडे बहीण-भाऊ उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.
आष्टी उपसा सिंचन क्र.३ शिंपोरा ते खुंटेफळ पाइपलाइन कामाची पाहणी, बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
फडणवीस-पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सोबत येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.
दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून येणार असल्याचे समजते. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र उशिरापर्यंत माहिती समजली नाही.
बॅनरवरूनही फोटो हटविले
महायुती सरकारमध्ये मुंडे बहीण-भाऊ मंत्री आहेत. त्यातही ते बीड जिल्ह्यातील आहेत. असे असतानाही आष्टीमध्ये लागलेल्या अनेक बॅनरवरून मुंडे बहीण-भावांचे नाव आणि फोटो वगळण्यात आले आहेत.
धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक याचिका
छत्रपती संभाजीनगर : मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेवर २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मुंडे यांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शपथपत्रात माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केला नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, तसेच बँकेतील जॉइंट व न्यायालयातील प्रकरणे यांची माहिती दडवून ठेवली असल्याचे म्हटले आहे.