'दारू पिऊन का आला?' वडिलांच्या प्रश्नाने मुलाचा संताप, थेट केले कुऱ्हाडीने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:43 IST2025-12-08T18:42:58+5:302025-12-08T18:43:23+5:30
डोक्यात बसणार होता वार, पण नशिबाने पिता वाचला; आरोपी मुलाला अटक

'दारू पिऊन का आला?' वडिलांच्या प्रश्नाने मुलाचा संताप, थेट केले कुऱ्हाडीने वार
- मधुकर सिरसट
केज (बीड): केज तालुक्यात एका अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने नात्याला काळिमा फासला आहे. 'दारू पिऊन घरी का आलास?' असे विचारणे एका पित्याच्या जीवावर बेतले असते. धारूर तालुक्यातील गांजपूर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री दारूच्या नशेत आलेल्या मुलाने रागाच्या भरात चक्क जन्मदात्या पित्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. नशिबाने ऐनवेळी कुऱ्हाड दांड्यातून निखळून पडल्यामुळे बापाचा जीव वाचला आणि पुढील अनर्थ टळला.
गांजपूर येथील भारत तुकाराम धोंगडे हे त्यांचे पुत्र नितीन धोंगडे (वय २५) याला शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आल्याबद्दल जाब विचारत होते. वडिलांच्या या बोलण्याचा नितीनला इतका राग आला की, त्याने शिवीगाळ करत थेट घरातील कुऱ्हाड उचलली आणि वडिलांच्या डाव्या हातावर जोरदार वार केला. यात भारत धोंगडे गंभीर जखमी झाले. यानंतर नितीनने कुऱ्हाडीचा दुसरा वार थेट पित्याच्या डोक्यावर करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याच वेळी कुऱ्हाड दांड्यामधून निखळून खाली पडली. कुऱ्हाडीऐवजी फक्त दांडा डोक्याला लागल्याने भारत धोंगडे रक्तबंबाळ झाले आणि जमिनीवर कोसळले. यामुळेच बापाचा जीव वाचला.
जखमी पिता रुग्णालयात, आरोपी जामिनावर
जखमी भारत धोंगडे यांच्या हातावर पाच टाके पडले असून, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणी जखमी पिता भारत धोंगडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा नितीन धोंगडे याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. युसूफवडगाव पोलिसांनी तातडीने नितीन धोंगडे याला अटक करत केज न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.