'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:13 IST2024-12-28T12:12:33+5:302024-12-28T12:13:14+5:30
नरेंद्र पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन आरोप केले आहेत.

'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २० दिवस उलटले. पण, अजूनही या हत्येतील आरोपी सापडलेले नाहीत. या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील सहभागी होणार आहेत. पाटील यांनी या प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना सुनावले आहे.
Santosh Deshmukh :'संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची हत्या', अंजली दमानिया यांचा मोठा दावा
बीड येथे पत्रकारांसोबत बोलताना नरेंद्र पाटील यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेत आरोप केले. नरेंद्र पाटील म्हणाले, मारेकरी आणि आका पकडला जाईल असं आम्हाला अपेक्षित होतं. परंतु काही मारेकरी पकडले, आका आणि दुसरे काही मारेकरी मोकाट सुटले आहेत. आता आकाचाही शोध लावला पाहिजे. शस्त्र परवानावरही कारवाई सुरू झाली आहे. आईला दिलेला शस्त्र परवाना मुलगा वापरतोय. मुलगी गोळ्या झाडून व्हिडीओ बनवत आहे. ती गोष्ट आज लक्षात आली आहे. तर दुसरीकडे पीक विम्याच प्रकरण बाहेर आले आहे. ज्या गावात काहींची शेतजमीनच नाही त्या लोकांचा पिकविमा काढला आहे. हा मोठा घोटाळा आहे, तर गर्भपाताचे प्रकरण समोर आले आहे, पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास लावला जात नाही, असा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.
"अनेक प्रश्न आज समोर आले आहेत. मध्ये एक गँग ऑफ वासेपूर चित्रपट आला होता. तशा पद्धतीने आता बीड जिल्ह्यात गँग ऑफ करा सुरू आहे. नरेंद्र पाटील यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेत आरोप केले. बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आता मुख्यमंत्र्यांनी घडा लावणे गरजेचे आहे, असंही पाटील म्हणाले. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधावर बोलताना पाटील म्हणाले, आता झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतरचे जर तुम्ही फोटो बघितले तर दिसतं. तर मतदानावेळी केंद्रावरील व्हिडीओ फुटेज समोर आले आहेत. यामध्ये त्यांचे संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत खास असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी ते स्टेटमेंट दिले आहेत.त्यांना ज्या खऱ्या गोष्टी माहिती आहेत. त्या माध्यमांसमोर येऊन उलगडा केला पाहिजे. चोराला, गुन्हेगाराला पाठीशी घालणे हे धनंजय मुंडे यांना सोबत नाही, असंही नरेंद्र पाटील म्हणाले. संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीचे फोटो आम्ही पाहिले. हे वाईट आहे. भयानक परिस्थिती आहे. मुख्यमंत्री जर मनसुख हिरेन प्रकरणामध्ये फास्टट्रॅकमध्ये एखादी केस चालवून त्यावेळी ते विरोधी पक्षनेते असतानाही ही गोष्ट उघडकीस आणली होती. मग आज १९ दिवसानंतरही वाल्मिक कराड आणि त्याची टीम का गजाआड होऊ शकत नाही?, असा सवालही पाटील यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजितदादांशी चर्चा केली पाहिजे. अजितदादा पवार, एकनाथ शिंदे या तिनही नेत्यांनी एकत्र बसलं पाहिजे. जर हे सगळे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत असतील तर धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी समजून तात्पुरता आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केला.