कारवाई करताच तहसीलदारांच्या गाडीवर वाळूमाफियाने घातले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:46 IST2021-04-07T16:44:20+5:302021-04-07T16:46:25+5:30
बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे दोन तलाठ्यांसोबत शासकीय गाडी (क्र. एमएच २३ एफ १००२ ) तालुक्यातील ढेकणमोहाच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळल्यानंतर त्याचा पाठलाग केला.

कारवाई करताच तहसीलदारांच्या गाडीवर वाळूमाफियाने घातले ट्रॅक्टर
बीड : अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बीड तालुक्यातील ढेकणमोह येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी एका वाळूमाफियाने थेट तहसीलदारांच्या गाडीवर थेट ट्रॅक्टर घालत त्या ठिकाणावरून पळ काढला. यात गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यााची प्रक्रिया सुरू होती.
बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे दोन तलाठ्यांसोबत शासकीय गाडी (क्र. एमएच २३ एफ १००२ ) तालुक्यातील ढेकणमोहाच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळल्यानंतर त्याचा पाठलाग केला. ढेकणमोह येथे एका ठिकाणी हा ट्रॅक्टर वळला, दरम्यान, त्याठिकाणी तीन ट्रॅक्टर व अवैध वाळू साठा आढळला. तहसीलदारांची गाडी पाहताच दोन ट्रॅक्टर त्याठिकाणी सोडून चालकांनी पळ काढला, तर एका ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट तहसीलदारांच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत त्याठिकाणावरून पळ काढला. यात तहसीलदार यांच्यासोबत तलाठी तांदळे, नागरगोजे, चालक यांची उपस्थिती होती. या धडकेत शासकीय गाडीचे नुकसान झाले असून, याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार शिरीष वमने यांनी दिली.
दोन ट्रॅक्टर जप्त
त्याठिकाणावरून दोन ट्रॅक्टरचालकांनी पळ काढला होता. ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयात उभा केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.