गहिनीनाथ गडावरून परताना दुचाकीसमोर श्वान आले; अपघातात वृद्ध भाविकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:08 IST2023-04-17T15:07:37+5:302023-04-17T15:08:07+5:30
बीड-नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथील घटना, अन्य एक गंभीर

गहिनीनाथ गडावरून परताना दुचाकीसमोर श्वान आले; अपघातात वृद्ध भाविकाचा मृत्यू
- नितीन कांबळे
कडा (बीड) : गहिनीनाथ गड येथे एकादशी निमित्त दर्शनवारी करून गावी असताना दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सांगवी पाटण येथे घडली. मुरलीधर पंढरीनाथ शेकडे (६०) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील गहुखेल येथील मुरलीधर शेकडे व नवनाथ दहिफळे,हे दोघेजण पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे एकादशी निमित्त रविवारी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन अकराच्या दरम्यान दुचाकीवरून ते दोघे परत गावी निघाले. बीड-नगर राज्य महामार्गावरून जात असताना सांगवी पाटण गावानजीक अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात झाला.
यात गंभीर जखमी झालेले मुरलीधर शेकडे व नवनाथ दहिफळे यांना उपचारासाठी अहमदनगर येथे नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुरलीधर शेकडे यांचा मृत्यू झाला. तर नवनाथ दहिफळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समीर शेख, सद्दाम शेख, गोवर्धन खिलारे,महेश खिलारे, धनंजय खिलारे, युवराज भोसले यांनी मदत केली. दरम्यान, मुरलीधर शेकडे यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात पत्नी, मुलगा, मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.