माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:22 IST2025-03-10T06:21:23+5:302025-03-10T06:22:35+5:30
धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा
बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसह, घटनेच्या निषेधार्थ बारामतीत रविवारी सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशमुख यांची मुलगी वैभवी हिने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले. माझ्या वडिलांचा गुन्हा कोणता?, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही, तर रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होईल, अशी भीती तिने व्यक्त केली. तर पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.
धनंजय देशमुख म्हणाले, मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न्यायाची भीक मागत आहे. २८ मे २०२४ रोजी या पहिल्या घटनेची सुरुवात झाली. अवादा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अपहरण झाले. कंपनीने २९ तारखेला एफआयआर दाखल केला. परंतु दोघांनी अपहरण केले होते. मात्र, त्यात एकाच व्यक्तीचे नाव आहे. त्याचा कुठेही तपास झाला नाही. आरोपींना कळून चुकले आपले काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने सूत्रधार वाल्मीक कराह याने सूचना दिल्या. त्याप्रमाणे २९ नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली. मात्र, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी?
वैभवी देशमुख हिने वडिलांसाठी न्याय देण्याची मागणी केली. माझ्या वडिलांची हत्या खंडणीतून झाली. ही खंडणी कोणासाठी जात होती, कोणासाठी ठेवली होती, असा सवाल तिने केला. माझ्या वडिलांनी नेमका काय गुन्हा केला होता. मागासवर्गातील बांधवाला वाचविण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी, असे घडल्यास कोणीच दुसऱ्यासाठी पाऊल उचलणार नाही, अशी भीती तिने व्यक्त केली.
माझे वडील संवेदनशील मनाचे
वैभवी म्हणाली, आमचं घर माळवदाच आहे. एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. मात्र, माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही. चिकटपट्टी लावून मुंग्या खाली येण्यापासून थांबविल्या. एवढ्या संवेदनशील मनाचे माझे वडील होते. हे सांगताना वैभवीचा अश्रूचा बांध फुटला. मला माझ्या वडिलांचा शेवटचं भेटायला मिळालं नाही, याचे मला खूप दुख आहे.
राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार
धनंजय देशमुख म्हणाले, ६ डिसेंबरला आठ जण कंपनीत आले. परत एकास अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. गावातील एकाने संतोष आण्णांना फोन केला. तो सोडवायला गेला. भांडण सोडविताना त्यांना मारले. त्या विरोधात अशोक सोनवणे हा पोलिसात तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. राजकीय पाठबळामुळे एफआयआर घेतला नाही. आताही तिथे वातावरण भयावह आहे. प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे आहेत. ते लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देणार असेही ते म्हणाले.