केज (बीड ) : धनेगाव येथील मांजरा धरणात कमी पाणी पातळी मृत साठ्यावर असल्याने त्यातून लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्या आदेशाने आज सकाळी ११ वाजता हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आमदार प्रा. संगिताताई ठोंबरे यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांना मंगळवारी निवेदन दिले होते.
तालुक्यात या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच धनेगाव येथील मांजरा धरण कोरडेठाक पडले आहे. यातून केज, अंबाजोगाई शहरासह दोन्ही तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
मांजरा धरणाची पाणीसाठवण क्षमता एकुण 224.93 दशलक्ष घनमीटर असुन 41.130 दशलक्ष घनमीटर पाणी मृत जलसाठा म्हणून निर्धारित करण्यात आलेले आहे. सद्य परिस्थितीत धरणात 46.523 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. हा साठा मृत जलसाठ्यापेक्षा कमी आहे. यामुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतीचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. याच धर्तीवर लातुर एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा अशी मागणी आमदार ठोंबरे यांनी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्याकडे मंगळवार केली.
यानंतर जलसंपदा मंत्री महाजन यांनी मांजरा धरणातून लातुर येथील एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश लातुर येथील कार्यकारी अभियंता श्रीमती जगताप यांना फॅक्सद्वारे दिले. यावरून आज सकाळी साडे अकरा वाजता पाणीपुरवठा बंद करण्यात आला.