वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:09 IST2025-01-03T12:07:41+5:302025-01-03T12:09:25+5:30
वाल्मीक कराडची चौकशी : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती

वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण
बीड : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले, तर इकडे बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत घेऊन दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली. तसेच इतरही काही माहिती घेतली. तर इकडे सीआयडीही खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची कसून चौकशी करीत आहेत. गुरुवारी सकाळीच नाश्ता झाल्यावर कराड याला बीड शहर पोलिस ठाण्यातील एका खोलीत नेले. तेथे बंद दाराआड चौकशी करण्यात आली. सध्या बीड शहर ठाण्यात बंदोबस्तही वाढविला आहे.
आरोपीचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा
खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वाँटेड म्हणून घोषित केले आहे. बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही दिला आहे.
वाल्मीक कराडचा दुसरा दिवसही भातावर
कराड हा सध्या बीड शहर ठाण्याच्या कोठडीत आहे. त्याला भात, वरण, पोळी, भाजी असे सरकारी जेवण दिले जात आहे. परंतु, यातील केवळ भात आणि वरणच कराड हा खात आहे. पहिल्या दिवशीही त्याने भातावरच दिवस काढला होता.
योगायोग; कराड अन् पलंग सोबतच
एखादा बडा नेता किंवा व्हीआयपी व्यक्तीला पोलिस कोठडीत सेवा, सुविधा पुरविल्याचे आपण अनेकदा ऐकले. आता या प्रकरणातही वाल्मीक कराड याला बीड शहर ठाण्यात आणण्यात आले. यावेळी काही तासानेच लगेच पाच पलंगही आणले. त्यातील चार पलंग हे बाहेर परिसरात तर एक पलंग हा ठाण्यात नेला. हा पलंग कराड याच्यासाठीच आणला, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, गुरुवारी सकाळीच अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याचा खुलासा करत हे पलंग कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर या चर्चांना विराम मिळाला.
सुरक्षा वाढविली, कोठडीबाहेर आठ कर्मचारी
कराड हा सध्या बीड शहर ठाण्याच्या कोठडीत आहे. त्यामुळे या परिसरात आणि कोठडीबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. एरव्ही तीन कर्मचारी आणि एक पर्यवेक्षण अंमलदार असायचा. परंतु, आता सहा कर्मचारी आणि पर्यवेक्षण अंमलदार असणार आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक असेल. तसेच पोलिस निरीक्षक हे प्रत्येक तीन तासाला भेट देणार आहेत.
बीपी अन् शुगरच्या गोळ्या दिल्या
कराड याला बीपी अन् शुगरचा त्रास आहे. पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला आता कोठडीतच गोळ्या पुरविल्या जात आहेत. गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही. प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला.
धनंजय देशमुख यांना पोलिस संरक्षण
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एक पोलिस कर्मचारी संरक्षणासाठी दिले आहेत. बाहेरगावी जाताना ते सोबत असतात. तसेच गुरूवारी एसआयटी व सीआयडी पथकाने भेट दिली नाही. मी केजला शासकीय विश्रामगृह येथे एसआयटी पथक येणार असल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गेलो होतो. परंतु, तोपर्यंत अधिकारी आले नव्हते. म्हणून मी परत मस्साजोगला आलो, असे धनंजय यांनी सांगितले.
पोलिसांची प्रतिमा मलीन करू नये
बीड शहर ठाण्याच्या पोलिस कोठडीबाहेर सुरक्षा वाढविली आहे. तसेच ठाण्यात ये-जा करणाऱ्यांची नोंद घेतली जाते. पलंगाबद्दल गैरसमज पसरला. कोठडीचा बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याने हे मुख्यालयातून देण्यात आले. एक पलंग हा महिला कर्मचाऱ्यांना दिला होता. अफवा पसरवून पोलिसांची प्रतिमा मलीन करू नये, असे आवाहन केले.
- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक बीड.