'गांजाप्रकरणी चौकशी करायची आहे'; गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 15:20 IST2021-10-13T15:20:01+5:302021-10-13T15:20:45+5:30
दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले.

'गांजाप्रकरणी चौकशी करायची आहे'; गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याला लुटले
गेवराई : दोघा भामट्यांनी व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची थाप मारली. गांजा पकडला असून त्यात तुमची चौकशी करायची आहे असे सांगून व्यापाऱ्याकडील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मोंढा मार्केट येथे मंगळवारी दुपारी घडली.
शहरातील महेश कॉलनी येथे राहणारे गंगाभिषण बिहारीलाल भुतडा ( ५९ ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगाभिषण भुतडा यांचे श्रीनिवास भुसार (कडधाण्याचे) मालाचे दुकान मोंढा भागात आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. आम्ही गुन्हे शाखेचे असून तुम्हाला दोनदा आवाज दिले, तुम्ही थाबले नाहीत. सोमवारी रात्री ५ ते६ लाखाचा गांजा पकडला असून या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे अशी थाप मारली.
यानंतर त्या दोघांनी भुतडा यांना रुमाल काढण्यास सांगून त्यात अंगावरील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल ठेवण्यास सांगितले. हातचलाखी करत त्यांनी दागिने व रक्कम काढून घेत मोबाईल भूताडांना परत केला. चौकशीचे नाटक करत काही वेळाने ते दोघे जवळपास ९० हजारांचा मुद्देमाल घेऊन तेथून फरार झाले. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोघे संशयित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुकाराम बोडखे करत आहेत.