वाण धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर; परळीकरांची पाण्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 16:47 IST2021-07-23T16:45:47+5:302021-07-23T16:47:23+5:30
हे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत.

वाण धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर; परळीकरांची पाण्याची चिंता मिटली
परळी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण पाणीसाठा वाढल्याने ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे .शनिवारी या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू शकेल. नागापूर धरण भरत आल्याने परळी शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
गेल्या पाच दिवसापासून वाण धरणावरील गावात दमदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी या धरणात येणे सुरू आहे त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. हे धरण भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. परळी तालुक्यातील नागापूरच्या वाण धरणातून शहराला पाणीपुरवठा केल्या जातो. सध्या परळी शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे . धरण भरत आल्याने आता परळीस दोन दिवसास नगर परिषदेने पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते आश्विन मोगरकर यांनी केली आहे
परळी तालुक्यातील बोधेगाव येथील धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच शहराजवळ असलेल्या चांदापूर मार्गावरील घनशी नदीला पाणी आले आहे. परळी ते चांदापुर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर गुरुवारी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन झाले.