वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 06:07 IST2025-01-26T06:06:45+5:302025-01-26T06:07:21+5:30
सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत.

वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याला पोटदुखीच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते; परंतु येथे स्वतंत्र कोठडी असतानाही त्याच्यावर मिनी आयसीयू असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करून ‘स्पेशल ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्याच्यासाठी इतर रुग्णांनाही इतरत्र हलविले आहे. सुरक्षेच्या नावाखाली हा प्रकार केला आहे; परंतु कोठडीच्या बाहेर कसली सुरक्षा, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे रुग्णालय अन् पोलिस वादात सापडले आहेत.
चार बेड अन् एक आरोपी
जिल्हा रुग्णालयात आजारी आरोपींवर उपचार करण्यासाठी जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे. तेथे चार बेड आहेत. मजबूत लाेखंडी दरवाजाही आहे. शनिवारी दुपारी येथे परळीच्या गुन्ह्यातील एकमेव आरोपी उपचार घेत होता. तीन बेड रिकामे होते. असे असतानाही कराड याला सर्जिकल वाॅर्डमध्ये उपचार केले जात आहेत.
सर्जिकल वॉर्ड सुविधायुक्त, चकाचक
सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत. या वॉर्डात २४ बेड आहेत. एका बाजूच्या बेडवर कराड असून, ११ बेड रिकामे आहेत.
सुरक्षेच्या नावाखाली कराडला बाहेर काढून चकाचक वॉर्डमध्ये ठेवले. येथे आरसीपीसह इतर असे जवळपास १० ते १५ पोलिस अधिकारी, कर्मचारी २४ तास तैनात आहेत. इतर रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणी केली जाते.
कराडला डिस्चार्ज
कराडच्या सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी तो ठिक झाल्याचे जिल्हा कारागृह प्रशासनाला कळविले. त्यानंतर रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कराडला रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी झाली.