पाण्यासाठी भटकंतीकरून गावकरी थकले, गोदापात्रात जलसमाधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:53 IST2021-03-27T16:52:44+5:302021-03-27T16:53:44+5:30
seek permission from CM for Jalasamadhi गावातील महिला, लेकराबाळ, आबाल वृद्धांना रणरणत्या उन्हात गोदावरी नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे.

पाण्यासाठी भटकंतीकरून गावकरी थकले, गोदापात्रात जलसमाधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी
माजलगाव : मोगऱ्यात महावितरण कंपनीने थकीबाकीच्या नावाखाली सार्वजनिक बोरची वीज तोडली. ग्रामपंचायतची थकबाकी भरण्याची ऐपत नाही. यामुळे गावातील महिला, लेकराबाळ, आबाल वृद्धांना रणरणत्या उन्हात गोदावरी नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने भटकंती करून थकलेल्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्याकडे गोदावारीपात्रात जलसमाधीला घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी तहसिलदारांमार्फत केली आहे.
कोरोना, गारपीट व अवकाळीच्या हातात हात घालून महावितरण आल्याने मोगरा वासीयांवर संकटांची मालिकाच कोसळली आहे. थकीतबिलामुळे महावितरणने सार्वजनिक बोरचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. गावाची लोकसंख्या 5 हजार असूनही इथे पाणीपुरवठा योजना नाही. जुने हातपंप नादुरुस्त आहेत. तर एकास दुषित पाणी येते. यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी 17 किमी दूर असलेल्या माजलगावला जावे लागत आहे. याला कंटाळून पाच दिवसांपूर्वी गावातील महिलांनी पाण्यासाठी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत समोर आंदोलन केले. ग्रामसेवक बजरंग राठोड यांनी लेखी आश्वासन देऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोर सुरू करतो असे सांगितले. परंतु, आंदोलन होऊन पाच दिवस झाले तरीही ग्रामसेवक गावात आलेला नाही. तर गावातील महावितरण कर्मचाऱ्याचे वागणे संशयास्पद असून संपूर्ण गावाची वीज तोडली असताना काही ठिकाणी आकडे टाकून विज सुरू असल्याचे दिसून आले.
भटकंती करून कंटाळलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने पाणी द्यावे अन्यथा प्रशासनाने गोदावरीत जलसमाधीस परवानगी तरी दयावी अशी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी तसे पत्र तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी पवन मोगरेकर, विकास झेटे, दत्ता महाजन यांची उपस्थिती होती.