बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:30 IST2025-10-30T14:07:07+5:302025-10-30T14:30:52+5:30
पैशाचे आमिष दाखवून पालघरहून आणले मजूर कुटुंब, सात जणांची सुटका

बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला!
बीड : पालघर जिल्ह्यातील गरीब मजुरांना पैशांचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यात आणले. त्यानंतर त्यांच्या अल्पवयीन मुला-मुलींकडून घरकाम व शेतीचे काम करवून घेण्यात येत होते. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुलीलाही भांडी घासायला लावले. याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी प्रशासनाच्या मदतीने केला. यात सात जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बालमजुरांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पालघर जिल्ह्यातील एका व्यक्तीने तत्त्वशील कांबळे यांना कॉल करून संपर्क साधला. यात त्यांचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलांना मौजे तागडगाव येथील धर्मराज हिरामण धनवटे याने आणून बंदिस्त ठेवल्याचे सांगितले. कोणताच मोबदला न देता त्यांना परत गावी जाऊ देत नसल्याची माहिती मिळताच, तत्त्वशील कांबळे यांनी तक्रारदाराला सोबत घेऊन थेट जिल्हाधिकारी, बीड यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी अनिता कदम, सरकारी कामगार अधिकारी अजय बळीराम लव्हाळे, राहुल उबाळे, तहसीलदार सुरेश घोळवे आणि शिरूर कासार पोलिस ठाण्याचे सपोनि. जाधव साहेब यांच्यासह एक पथक तातडीने तागडगाव येथे दाखल झाले.
अल्पवयीन मुलींकडून अमानवी काम
पथकाने धर्मराज धनवटे यांच्या घरी तपासणी केली असता, त्यांना संबंधित मजूर आणि त्याची पत्नी व मुले घरकाम करताना आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, इतर अल्पवयीन मुली मारोती ज्ञानदेव सानप यांच्या शेतात कपडे धुणे, भांडी घासणे व म्हशी सांभाळणे ही कामे करत होत्या. तसेच, नंदू ज्ञानदेव पवार यांच्या शेतातूनही एक अल्पवयीन मुलगी काम करताना ताब्यात घेण्यात आली. यामध्ये, तीन वर्षांच्या लहान मुलीलाही भांडी घासणे व म्हशी सांभाळण्याच्या कामात जुंपण्यात आले होते, हे सर्वांत गंभीर आहे.
धमक्या देऊन वेठबिगारी
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज धनवटे, मारोती ज्ञानदेव सानप, नंदू ज्ञानदेव पवार (सर्व रा. तागडगाव) आणि रामहारी आश्रुबा खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) यांनी त्यांना जास्त पैशांचे आमिष दाखवून पालघर येथून आणले. मात्र, त्यांना कमी मोबदल्यात वेठबिगारीचे काम करण्यास लावले आणि गावाकडे गेल्यास जिवे मारून टाकू, अशी धमकी देत बंदिस्त ठेवले होते. पथकाने पंचनामा करून सर्व पीडितांची सुटका केली असून, तत्त्वशील बाबूराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध वेठबिगारी आणि बळजबरीने काम करवून घेण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगारीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.