वाल्मीक कराडचा न्यारा थाट, १५ गुन्हे तरीही शस्त्र परवाना; पोलिसांच्या पत्रानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली नाही कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:01 IST2024-12-31T07:00:41+5:302024-12-31T07:01:18+5:30
...एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.

वाल्मीक कराडचा न्यारा थाट, १५ गुन्हे तरीही शस्त्र परवाना; पोलिसांच्या पत्रानंतरही जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली नाही कारवाई
बीड : मस्साजोग येथे पवनचक्कीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.
केज तालुक्यातील मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजले आहे. याच गुन्ह्यातील सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या दोन आरोपींच्या समवेत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड याने पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यात आतापर्यंत केवळ चाटे अटकेत आहे. अजूनही कराड आणि घुले मोकाटच आहेत. सीआयडीकडून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केल्याचे सांगण्यात येत आहे.
विषय गाजल्यावर आता नोटीसेस
कराड याला पोलिसांचे दोन बॉडीगार्ड होते. तसेच त्याला शस्त्र परवानाही होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या २४५ जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यात कराडचेही नावे होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही. आता विषय गाजल्यावर नोटीस बजावल्या आहेत.
गुन्हा दाखल, तरी सोबत बॉडीगार्ड
११ डिसेंबर रोजी कराडविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. १३ डिसेंबर रोजी तो मध्य प्रदेशमधील उज्जैनला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर आहे. यावेळी सोबत पोलिस बॉडीगार्डही आहे. मग तेव्हाच त्याला अटक का केली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
फडणवीस बीडचे पालकमंत्री व्हावेत : आमदार धस
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, केमिकलयुक्त ताडी विक्री होत आहे. जिल्ह्यात अगदी सहजपणे शस्त्र परवाना दिला असून, परळी तालुक्यात रात्रीच्या वेळी ३०० पेक्षा अधिक टिप्पर गुंडांच्या मदतीने चालतात. अशा परिस्थितीमुळे विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजेत, असे मत भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
धनंजय देशमुख यांची हायकोर्टात धाव
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येच्या तपासाबाबत पोलिसांना योग्य निर्देश द्यावेत, खंडणीच्या गुन्ह्याचा मास्टरमाइंड आरोपी वाल्मीक कराड याचे मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेले राजकीय लागेबांधे पाहता या घटनेचा तपास निष्पक्ष होण्यासाठी योग्य त्या कारवाईचे निर्देश पोलिस प्रमुख आणि राज्याच्या गृहसचिवांना द्यावेत, अशी मागणी करणारी क्रिमिनल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. मृत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली.
अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याबाबतचा आदेश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
धस, दमानिया यांनी घेतली एसपींची भेट
भाजपचे आ. सुरेश धस यांनी आधी जिल्हाधिकारी आणि नंतर पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याच्या फेक मेसेजसंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत गोळीबार, पवनचक्कीच्या वादातून घडलेले गुन्हे, वाल्मीक कराडचा बॉडीगार्ड आदींची माहिती मागविल्याचे दमानिया म्हणाल्या.